शेतकरी आहात मग हे नक्की वाचा ; शेतजमिनीचे आरोग्य व्यवस्थापन कसे करावे

शेतकरी आहात मग हे नक्की वाचा ; शेतजमिनीचे आरोग्य व्यवस्थापन

जमिनी धुप होण्यामुळे नापीक होत आहेत, तर बऱ्याच वेळा सिंचन क्षेत्रातील पाण्याचा अतिरेकी वापर, अयोग्य पाणी व्यवस्थापन व एकसारख्या पीक पद्धतींमुळे क्षारपड जमिनीचे क्षेत्र वाढत आहे.

कृषि उत्पादनाकरिता जमीन व पाणी हे दोन महत्त्वाचे घटक नैसर्गिक स्रोत जातात. कृषि उत्पादनाची उच्चतम पातळी गाठण्याकरिता आणि उत्पादनात सातत्य राखण्याकरिता जमिनीचे आरोग्य उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे. कोरडवाहू क्षेत्रात जवळपास ४० टक्के जमिनी धुप होण्यामुळे नापीक होत आहेत, तर बऱ्याच वेळा सिंचन क्षेत्रातील पाण्याचा अतिरेकी वापर, अयोग्य पाणी व्यवस्थापन व एकसारख्या पीक पद्धतींमुळे क्षारपड जमिनीचे क्षेत्र वाढत आहे. या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे सिंचन क्षेत्रात सेंद्रिय खतांचा अपुरा पुरवठा, रासायनिक खतांचा असंतुलित वापर आणि पीक फेरपालटीचा अभाव हे आहे.

जमिनीतील महत्त्वाच्या जैविक घटकांना जमिनीची जैविक उत्पादकता, हवा व पाणी यांची प्रत, वनस्पती, प्राणी व मानवी आरोग्य राखण्याच्या जमिनीच्या ताकदीस जमिनीचे आरोग्य असे म्हणतात. जमिनीची प्रत किंवा जमिनीचे आरोग्य हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात.

 

जमीन आरोग्य संकल्पना
मनुष्याच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. अलीकडच्या काळात जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, दिवसेंदिवस जमिनीची उत्पादकता कमी कमी होत आहे. याची प्रमुख कारणे म्हणजे जमिनीचा अतिवापर, सेंद्रिय खतांचा अभाव, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, पाण्याचा अयोग्य वापर इत्यादींमुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. जमिनीतून मानवासाठी अन्न, जनावरांसाठी चारा आणि कृषि उद्योगांसाठी कच्चा माल उत्पादित केला जातो.

भारतातील वाढती लोकसंख्या आणि जमिनीचे ठराविक क्षेत्रफळ यावरून जमिनीचा योग्य वापर करून जमिनीचे आरोग्य अबाधित ठेवणे महत्त्वाचे आहे.
जमीन ही नैसर्गिकरित्या, नैसर्गिक सामग्रीवर, नैसर्गिक शक्तीच्या प्रक्रियेने तयार झालेली आहे. जमिनीला विविध प्रकारचे रंग, रूप, घडण, खोली असते त्याचबरोबर जमिनीत अंतर्गत अनेक प्रक्रिया होत असतात. वेगवेगळ्या जमिनी या प्रामुख्याने निरनिराळ्या खडकांपासून तयार झालेल्या असतात, म्हणून खडक हे जमिनीचे पितृ घटक आहेत.

Growing Young Green Seedling Sprout in Cultivated Agricultural Farm Field close up

कुठल्याही जमिनीत प्रामुख्याने खनिज पदार्थ, सेंद्रिय पदार्थ, पाणी, हवा आणि सूक्ष्म सजीवसृष्टी ह्या पाच घटक आढळून येतात.ह्या पाच घटकांचे प्रमाण वेगवेगळ्या जमिनीत कमी जास्त प्रमाणात आढळून येते. जमिनीची सुपीकता आणि उत्पादनक्षमता प्रामुख्याने या पाच घटकांवरच अवलंबून असते, म्हणून या बाबींचे योग्यप्रकारे संवर्धन करणे हे जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

जमीन आरोग्य निर्देशांक

जमीन ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे. यामध्ये शेतीसाठीची विविध कार्ये केली जातात, जसे कि अन्नद्रव्यांचे चक्रीकरण व साठवणूक, सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांचे सुयोग्य नियंत्रण, जमिनीतील पाणी व विद्राव्य घटकांची वनस्पतीकरिता उपलब्धता, त्याचप्रमाणे शेतीव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी भौतिक माध्यम, कच्चा माल पुरविण्याचे साधन आहे. परंतु, जमीन ही वाढ न होणारी, मर्यादा असलेली नैसर्गिक संपत्ती आहे. सद्य:परिस्थितीत जमिनीची अवनिती हवा व पाण्यामुळे होणारी धूप, जंगलतोड, आम्ल व विम्ल जमिनीच्या क्षेत्रात होत असलेली वाढ या गोष्टींमुळे अतिशय झपाट्याने होत आहे. म्हणून जमीन या नैसर्गिक संपत्तीस सुस्थितीत ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.

जमिनीतील आरोग्य निर्देशांकाचे घटक खालीलप्रमाणे असतात.

अ.क्र. जमीन आरोग्य निर्देशांक जमिन आरोग्य निर्देशांकाचे घटक
१ भौतिक आरोग्य निर्देशांक जमिनीची संरचना
जमिनीची खोली
जमिनीची घनता
जमिनीची जलधारण क्षमता
२ रासायनिक आरोग्य निर्देशांक सेंद्रिय पदार्थ (कार्बन)
सामू (आम्ल-विम्ल निर्देशांक)
विनिमय क्षमता
विद्युत वाहकता
उपलब्ध अन्नद्रव्ये
३ जैविक आरोग्य निर्देशांक सुक्ष्मजिवाणू
सूक्ष्म प्राणी
जमिनीतील विकरांची क्रिया
जमिनीतील सजीव सृष्टीमार्फत होणारा जमिनीचा श्वासोच्छवास

जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन

सुपीक जमीन ही निसर्गाची एक देणगी असून तिची योग्य काळजी घेतल्यास ती चिरकाल अन्नाची निर्मिती करत राहील. पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी पिकांच्या मुळांना अन्नद्रव्ये पुरविण्याची जमिनीची क्षमता चांगली असावी लागते, सुपीक जमिनीत जिवाणूंमध्ये ऊर्जा निर्माण होते. उष्णता व प्रकाश यांचे रासायनिक ऊर्जेमध्ये रुपांतर होते, हीच ऊर्जा जमिनीला परत मिळून जीवांची उपजीविका होते.

जमिनीची सुपीकता या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एक बाजू जरी कमी पडली तरी उत्पादनात घट येते. पिकांचे अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी जमिनीच्या पिकांना पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याच्या क्षमतेला जमिनीची सुपीकता म्हणतात. सुपीकता हा जमिनीचा एक गुणवत्तादर्शक घटक असून वनस्पतीच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा करते.

जमिनीची उत्पादनक्षमता ही जमिनीच्या सुपीकता पातळीशी निगडीत असते. जमिनीची उत्पादनक्षमता ही जमिनीचा कस, जमिनीचे फूल, पोत, जैविक गुणधर्म, अन्नद्रव्ये, पुरवठाक्षमता, वनस्पतीच्या वाढीस लागणारे तापमान, पाण्याचा पुरवठा, सूर्यप्रकाश, हवा, इत्यादी घटकांवर अवलंबून असते.

एखादी जमीन सुपीक असूनही तिची उत्पादनक्षमता कमी असते, कारण अशा जमिनीत भरपूर प्रमाणात वनस्पतीला पोषक अन्नद्रव्ये उपलब्ध असूनही ती पिकांच्या वाढीसाठी काही कारणांनी मिळू शकत नाहीत. उदाहरणार्थ, शेतीउपयोगी पाणी किंवा जमिनी खूपच आम्लयुक्त किंवा विम्लयुक्त असतील तर अशा जमिनीतील अन्नद्रव्ये पिकांना योग्य प्रमाणात मिळू शकत नाहीत, म्हणून जमिनी सुपीक असूनही त्या जमिनीत पिकांची वाढ समाधानकारक होत नाही.

 

जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या व्यवस्थापनामध्ये खालील बाबींवर भर दिला पाहिजे.

१. जमिनीतील पाणी, हवा व वनस्पती यांचा योग्य संबंध राखण्यासाठी योग्य मशागत करावी. जमिनीला पिकांच्या आवश्यकतेनुसार माती परीक्षण करून सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा समतोल पुरवठा करावा.

२. जमिनीची पोत, प्रत आणि सुपीकता यांचा विचार करून जमिनीचे फूल टिकून ठेवावे, पिकांची फेरपालट करावी, जमिनीची धूप थांबवावी आणि किडी रोगांचे जैविक दृष्टीकोनातून नियंत्रण करावे.

३. जमिनीतील अपायकारक क्षार निचऱ्याचा अवलंब करून आणि भूसुधारकांचा वापर करून काढून टाकावेत. त्यासाठी जमिनीत उघडे अथवा बंदिस्त चर खोदून पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी.

४. जमिनी जास्त विम्लयुक्त असल्यास जिप्समचा वापर करावा आणि जास्त आम्लयुक्त असल्यास चुन्याचा वापर करावा, त्यासाठी जमिनीस जिप्सम किंवा चुन्याची मात्रा काढण्यासाठी मातीच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करून त्यावर शास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा.

प्रा.योगेश रमेश गवई (प्राचार्य)
प्रा.अविनाश अनंतराव आटोळे (सहाय्यक प्राध्यापक)
प्रा.तुळशीराम विष्णू राठोड (सहाय्यक प्राध्यापक)
स्वातंत्र्यविर गणपतराव इंगळे कृषि महाविद्यालय, जळगांव जामोद, जि: बुलडाणा
मोबाईल क्र. ९८६०३३१६६६ / ९०७५७४३४१० , ई-मेल आयडी: yogesh.gawai@gmail.com

जमीन आरोग्य निर्देशांकामध्ये जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांचा समावेश होतो. जमिनीचे हे तीनही गुणधर्म परस्परांवरील क्रिया करून जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढवितात. यातूनच जमीन आरोग्य निर्देशांकाची योग्य माहिती मिळते. जमीन आरोग्य निर्देशांकानुसार जमीन व्यवस्थापन प्रणाली ठरविता येते आणि शाश्वत उत्पादकता व वातावरणाची प्रत अबाधित राखता येते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: