राज्यात कायद्याचे राज्य आहे तर अनिल परबांना स्वतःहून अटक करा – चंद्रकांत पाटील

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केलेल्या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच संजय राऊतांनी तर थेट नारायण राणे आणि भाजपवर जोरदार प्रहार केला होता. आता राऊतांनी केलेल्या टीकेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेत जोरदार टोला लगावला आहे. राज्यात कायद्याचं राज्य आहे तर सरकारने अनिल परब यांना स्वत:हून अटक करावी, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी तीन ट्विट करून संजय राऊतांवर प्रश्नांचा ससेमिरा लगावला होता. ‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे.’ असे संजय राऊत म्हणाले होते. त्यामुळे अनिल परब यांना हे सरकार स्वतःहून अटक करेल अशी शक्यता आहे. अनिल परब यांच्याविरोधातील तक्रार तयार आहे. जर सरकारने स्वतःहून अटक केली नाही, तर आम्ही लवकरच तक्रार दाखल करू, असा इशारा पाटील यांनी दिला.

शिवसेना खासदार संजय राऊत हे जनतेतून निवडून येत साधे नगरसेवकही झाले नाहीत, त्यामुळे कोण शहाणं आणि कोण वेडं हे त्यांनी ठरवू नये. तो अधिकार केवळ मतदारांनाच असतो आणि मतदार सुज्ञ आहेत. मतदानाच्या वेळी मतदार आपला अधिकार चोख बजावतील, असा टोला त्यांनी लगावला.

Team Global News Marathi: