भाजपाकडून नारायण राणेंच्या खांद्याचा वापर, खासदार संजय राऊत यांना टोला

 

नाशिक | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. त्यातच आता भाजपकडून सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यासह भाजपाला जोरदार टोला लगावला होता.

भाजपाने नारायण राणे यांच्या खांद्याचा उपयोग करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू केली. त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागले. वेळ पडली तर यापुढेही तेच होईल. परंतु भाजपने ज्या पद्धतीने राणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारल्या ते पाहता, आमच्याकडेही शिवसैनिकांचे खांदे भरपूर आहेत. त्याचा उपयोग करू देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी दिला.

राऊत यांनी शनिवारी नाशिकच्या शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसेनेतून अनेक गेले अनेक आले; परंतु राणे यांच्यासारखा उत-मात कोणी केला नाही. शिवसेेनेसमोर ज्यांचे वेडेवाकडे पाऊल पडले ते संपले, असे सांगून, शिवसैनिकांना नाशिकमध्ये दगड का हातात घ्यावे लागले याचे आत्मपरीक्षणही संबंधितांनी करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

राज्यातील अन्य तीन केंद्रीय मंत्री जन आशीर्वाद यात्रेनिमित्त केंद्र सरकारच्या योजना व त्याचा प्रचार, प्रसार करण्याचे काम करीत आहेत. मात्र एक अतिशहाणा मंत्री मोदी यांचे व सरकारचे आदेश न पाळता शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका करीत सुटला आहे. त्यामुळे व्हायचे तेच झाले. ते घसरल्यावर लगाम घालावाच लागला, असे सांगून राणे यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा व त्यांना झालेली अटक याचे राऊत यांनी समर्थन केले.

Team Global News Marathi: