बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार हरला तर त्याला शिवसेना जबाबदार असेल! – नीलेश राणे

बेळगाव पोट निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शुभम शेळके मैदानात उतरले आहे. शेळके यांना संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. तसेच १४ एप्रिल रोजी शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी थेट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत बेळगावात दाखल झाले होते. याच मुद्द्यावरून आता नीलेश राणे यांनी सेनेवर टीका केली आहे .

‘महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार बेळगावात हरला तर फक्त शिवसेना जबाबदार. काँग्रेसला जिंकवण्यासाठी संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीची दिशाभूल केली आणि महाराष्ट्राची बाजू कमजोर करण्याचं पाप शिवसेनेने केले. जी एकी समितीमध्ये होती, त्याच्यामध्ये फूट पाडण्याचे काम राऊतांनी केले.’ असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

भाजप खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या १७ एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून २ मेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी आणि काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहे.

Team Global News Marathi: