…तर आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारले नाही,तर माझे नाव संजय राऊत नाही !

नवी दिल्ली : भाजप नेते किरीट सोमय्या हे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांविरोधात सातत्याने अनेक आरोप करताना दिसत आहेत.यावर आता शिवसेनेने देखील दंड थोपटले असून सोमय्यांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याची चाचपणी सुरू केल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी असे गंभीर आरोप करणाऱ्यांना जाहीर इशाराच दिला आहे.त्यांनी केलेले आरोप जर सिद्ध झाले नाहीत,तर ईडी कार्यालयासमोर जोड्याने मारणार,असा आक्रमक इशाराच संजय राऊत यांनी दिला.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी आरोप करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांवर एका पाठोपाठ एक गंभीर आरोप केले आहेत.नुकताच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप केला आहे.त्यामुळे शिवसेना याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.यासंदर्भात संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले,“ज्या पद्दतीने ही जी मंडळी आहे,अफाट, बेफाट, तोंडफाट पद्धतीने जे आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही.काहीही कागदे फडकावतात आणि आरोप करतात.आमदार प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते तसेच मी आणि माझ्या कुटुंबाच्या बाबतीत हेच केले.त्यांच्यात हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवावे.

अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे ते न्यायालयात जाईल. पण, आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारले नाही,तर माझे नाव संजय राऊत नाही, हे मी आधीच सांगितले आहे”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तुमच्या सारख्या फडतूस लोकांनी आरोप करत बसावे आणि त्यातून पक्षाने वाईट प्रसिद्धी मिळवावी यासाठी राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता केली नाही, अशा शब्दांत त्यांनी खडसावले.

मला आणि माझ्या पक्षाला आमची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. ही कायद्याच्या पलीकडील भाषा नाही. जे कायद्याच्या पलीकडे असे वक्तव्य करत आहेत, त्यांच्याकडे कायद्याची कोणती चौकट आहे? असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या पक्षाने सांगावे आमचा या व्यक्तीशी संबंध नाही. ही जी माकडे उड्या मारत आहेत त्यांच्याशी आमचा संबंध नाही हे त्यांनी सांगावे. तपास यंत्रणांनी आपला तपास जरूर करावा. मात्र हे जे बाहेर लोक आहेत त्यांच्याकडे ही खरी, खोटी जी माहिती येते. त्यामुळे समाजातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न ते करतात. अशावेळी बेकायदेशीर काम करणाऱ्या या लोकांना हे जे ब्लॅकमेलर्स आहेत, त्यांच्याविषयी कोणती भूमिका घेणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

आमच्याही सुरक्षा काढल्या म्हणून आम्ही बोंबललो नाही

राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली असून त्यात राजकारण केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, मला वाटत नाही यात कोणतेही राजकारण झाले आहे. याआधी आमच्याही सुरक्षा काढल्या आहेत. पण म्हणून आम्ही कधी बोंबललो नाही. मागच्यावेळी आम्हीही सरकारमध्ये होतो तेव्हा माझीही सुरक्षा काढून टाकण्यात आली. मात्र मी एका शब्दाने तक्रार केली नाही. सरकारी यंत्रणांची कमिटी असते त्यातील महत्त्वाचे लोक ते निर्णय घेत असतात. महाराष्ट्राचे सरकार हे अत्यंत जागरूक आणि संवेदनशील सरकार आहे. विरोधकांच्या जीवाशी खेळावे किंवा त्यांच्याशी सूडबुद्धीने वागावे असा ट्रेण्ड राष्ट्रीय राजकारणात सुरू आहे. अशा प्रकरची भावना आणि भूमिका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आहे, असे कोणीही म्हणू शकणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेवर संजय राऊत म्हणतात…

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सध्या सुरू आहे. यासाठी नाना पाटोलेंचे नाव चर्चेत आहे. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले कि, विधानसभेतील अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे. विदर्भातील नाना पटोले तिथे अध्यक्ष आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षासाठी नाना पटोलेंचे नाव चर्चेत असल्याचे माध्यमांतून समोर आले आहे. मात्र शेवटी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षातील ही घडामोड आहे. त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आमच्यातील कोणताही घटक पक्ष अंतर्गत अस्थिर, अस्वस्थ होऊ नये, अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. तरच हे तीन पक्षांचे सरकार प्रदीर्घ काळ चालणार, अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली

ग्लोबल न्युज नेटवर्क: