“आपल्या सर्वांसाठी मुक्तीचा अर्थ म्हणजे स्त्री-पुरुष व्दंव्दापलीकडे, देहापलीकडे…

“आपल्या सर्वांसाठी मुक्तीचा अर्थ म्हणजे स्त्री-पुरुष व्दंव्दापलीकडे, देहापलीकडे जाण्याचा प्रयत्न करणे हा असतो…..!”

हा विचार सर्वसामान्य स्त्रियांनी रचलेल्या, आपले सांस्कृतिक संचित असलेल्या लोकसाहित्यातून घेतला आहे.

राधा रुसली, कृष्ण तिची समजूत घालायला गेला. तिने सांगितलेले सारे सारे त्याने मान्य केले. पण तिचा रुसवा जात नव्हता. ती म्हणाली, “माझ्यासाठी पायघड्या घाल.”
“कसल्या ?” तर म्हणे, “फुलांच्या.”

मग कृष्णाने सारी सुंदर सुगंधित फुले जमा करून त्याच्या पायघड्या अंथरल्या. पण तरी राधेचा रुसवा गेला नाही. अखेरीस ती म्हणाली, “माझे पाय मळले आहेत. ह्या मळक्या पायांनी मी पायघड्यांवरून कशी चालू ? तू तुझ्या हाताने माझे पाय धू.”

 

कृष्णाने तिचे पाय धुतले व कमळाच्या तंतुनी ते पुसले. तेव्हा ती म्हणाली, “आतापर्यंत माझ्या सर्व अंगांना तुझा स्पर्श झाला होता. फक्त पाय राहिले होते. आज पहिल्यांदा माझ्या चरणांना तुझा स्पर्श झाला. आता मी धन्य झाले.”
त्यावर कृष्ण म्हणाला, “तुझ्या चरणांना स्पर्श करून मीही धन्य झालोय राधे….!”

आपल्या परंपरेत कृष्ण हा देव प्रेमाचे प्रतिक मानला गेलाय. त्याच्यासोबतच्या तीन स्त्रिया सत्यभामा, रुक्मिणी आणि राधा महत्वाच्या आहेत. सत्यभामा ही परंपरेने मिळालेली पत्नी तर रुक्मिणी ही त्याने प्रेमाने वरली होती. या दोघींमधील वाद हा अनेक आख्यायिकांचा विषय मग ती पारिजातकाची कथा असो की आणखी कोणती. त्यातून त्याचे चातुर्य प्रकट होते.

पण जी तिसरी स्त्री आहे राधा, ती त्याची कोण ? म्हटले तर कोणीच नाही. पण आजही राधा-कृष्ण हे आदर्श दंपतीचे प्रतिक आहे. राधा-कृष्णाचे नाते हे सर्वात उन्नत, उत्कट प्रेमाचे प्रतिक आहे. ह्यात कृष्णाला चातुर्य दाखविण्याची गरज नव्हती. त्याचे राधेशी असणारे नाते हे बरोबरीचे नाते होते कारण ते स्त्री-पुरुष द्वंद्वापलीकडे गेलेले नाते होते.

स्त्री-देहाचे किंवा पुरुषाच्या कायेचे, म्हणजेच नरदेहाचे आवरण घेतल्यामुळे आपण स्वतंत्र होऊ शकत नाही. त्यासाठी देहातीत व्हावे लागते. ‘मुक्ती म्हणजे देह असूनही देहाच्या भावातून, भोगातून मुक्ती’ हाच खरा संताना देखील अभिप्रेत असलेला मुक्तीचा अर्थ होता.

संकलन..
– नरेंद्र गायकवाड.

ग्लोबल न्युज नेटवर्क: