“.तर भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही” संजय राऊतांचा इशारा

 

मुंबई | पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध पेटलेले दिऊन येत आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून पाच राज्यांच्या निवडणूक निकाला संदर्भात भाष्य केले आहे. तसेच २०२४ पर्यंत एखादे सर्वमान्य नेतृत्व लोकांनी निर्माण केले तर भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही संजय राऊतांनी केला आहे.

काय लिहिले आहे सामना अग्रलेखात वाचा

‘पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे कवित्व आणखी काही काळ सुरू राहील. कारण मोदी राज्यांतील उत्सव लवकर संपवले जात नाहीत. पाच राज्यांचे निकाल म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे मार्गदर्शक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले. त्यावर अनेक प्रमुख नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होत नसतो. देशासाठी लढाई २०२४ मध्येच होणार आणि तेव्हाच ती लढली जाईल.

आज कोणत्याही राज्याची लढाई संपूर्ण देशाचे भवितव्य ठरवू शकत नाही, असे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे, ते खरे आहे. विरोधी पक्षांत तगडे नेतृत्व नाही. त्याचा फायदा भाजपला होत आहे. हेच त्यांच्या विजयाचे सूत्र आहे. २०२४ पर्यंत असे एखादे सर्वमान्य नेतृत्व लोकांनी निर्माण केले तर भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.’

दरम्यान, पंजाबातील मतदानावर प्रभाव पडावा व भाजपला फायदा व्हावा यासाठी खून, बलात्कार, लुटमार अशा आरोपांनी बरबटलेल्या बाबा राम रहिम यास ‘निवडणूक’ मोसमाच्या मुहूर्तावर खास पॅरोलवर सोडण्यात आले. तरीही पंजाबात भाजपला हाती काहीच लागले नाही. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच ‘हिजाब’चा राष्ट्रीय बनवलेला मुद्दाही संपवला गेला आहे.

दाऊद, पाकिस्तान आणि दहशतवाद वगैरे मुद्दे आता अर्थहीन ठरले असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हे सर्व मुद्दे जिवंत केले जातील. त्यामुळे लोकांनी आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर मतदान केले या भाकडकथांना अर्थ नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वास सध्या तरी तोड व जोड नाही हे खरे. मोदी-शहा व त्यांची संपूर्ण झुंड निवडणुकीच्या मैदानात अत्यंत बेफाम पद्धतीने उतरत असे राऊत यांनी सामना अग्रलेखात म्हंटले आहे.

Team Global News Marathi: