पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावर मला काय बोलायचे नाही पण….. – बाळासाहेब थोरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी ढाका येथे पोहोचले होते. त्यांचा हा दोन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी भारतीय उपखंडातील दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी एकजूट दाखवण्याची आणि जागरूक राहण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात केले होते.

यावेळी कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावे म्हणून मी सुद्धा लढ्यात उतरलेलो, मला अटकही झाली होती असे त्यांनी सांगितले होते. मोदींच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली असताना दुसरीकडे याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला आहे.

बांगलादेश देशमुक्ती संग्रामातील सहभागासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय वक्तव्य केले, याबद्दल आपल्याला काही बोलायचे नाही. मात्र, ज्या देशाला आपण आजपर्यंत गरीब समजत होतो, त्याच्या प्रगतीचा वेग आपल्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे बांगलादेशाच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधानांनी किमान त्यांच्या प्रगतीच्या सूत्राचा अभ्यास करून यावे,’ असा सल्ला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.

बांगलादेशमुक्ती लढ्यातील दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे योगदान कोणालाच नाकारता येत नाही. परदेशात गेल्यावर का होईना मोदींनाही ते मान्य करावे लागते. आतापर्यंत आपण बांगला देश हा गरीब देश मानत होतो. मात्र, सध्या या देशाने सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केल्याचे दिसून येते. त्याचा अभ्यास मोदींनी करावा. त्याचा उपयोग आपल्या देशात सत्ता चालविताना होत असलेल्या चुका सुधारण्यासाठी त्यांना होईल.’असा टोला सुद्धा त्यांनी लगावला होता.

Team Global News Marathi: