मी ब्राह्मण म्हणून मला टार्गेट केलं जातंय ; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबई : माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारले तर चालते.काही लोकांकडून तसा प्रयत्न देखील होत आहे,असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एबीपी माझा वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हे विधान केले.मराठा समाजाच्या हितासाठी मी काय केले हे राज्यातील सर्व लोकांना माहित आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जातीचाच चक्क उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधल्याने एक वेगळीच चर्चा आता सुरू झाली आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एका सिद्धांताची आठवण करून देते सरकारवर टीका केली आहे. “जेव्हा तुम्ही लोकांना समजावू शकत नाही तेव्हा त्यांना गोंधळात टाका, असा सिद्धांत आहे. आणि कसेही करून हे मागच्या सरकारच्या माथी कसे मारायचे. दुर्दैवाने, मी स्पष्ट बोलत आहे की, काही बोटावर मोजण्या इतकी अशी काही लोक आहेत. ज्यांना असे वाटते की, माझी जात ब्राह्मण असल्यामुळे माझ्या माथी सर्व मारले तर चालते. असा प्रयत्न काही लोक करतात. पण मराठा समाजाला आणि राज्यातील सगळ्या लोकांना हे माहिती आहे की, समाजाच्या हिताकरिता मी काय केले आहे. त्यामुळे अशा बातम्या पसरवण्याचे जे काम करतात ते यशस्वी होणार नाहीत”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकारने मेगा पोलीस भरती जाहीर केली आहे. आमच्या सरकारनेही ती केली होती. मात्र, आम्हाला ती रद्द करावी लागली. आताही राज्य सरकारने ती जाहीर केली आहे. परंतू, मराठा आरक्षणास स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे त्याचाही राज्य सरकारने विचार करायला हवा. भरती करणे आवश्यक असते. ती करायला हवी. परंतू, त्या आधी मराठा समाजाशी चर्चा करुन निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा काही समाजात आपल्याला डावलल्याची भावना निर्माण होऊ शकते असेही फडणवीस म्हणाले

देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या नेतृत्वाविषयी देखील यावेळी भाष्य केले. “छत्रपतींच्या घराण्यात कोणीही फूट पाडू नये. छत्रपतींचे घराणे हे मोठे घराणे आहे. दोन्हीही छत्रपती आमच्यासाठी आदरणीय आहेत. आपले आराध्य दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्या वंशजांबद्दल आपल्या सर्वांच्या मनात अपार श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्यात कोणी फूट पाडू नये”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या लढ्याचे नेतृत्व भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी करावे, असे काहींनी म्हटले आहे. तर काही नेत्यांनी खासदार संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: