मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय, जयंत पाटीलांनी व्यक्त केली इच्छा !

मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय, जयंत पाटीलांनी व्यक्त केली इच्छा !

गेली २० वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपले उद्दिष्ट आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनातील इच्छा बोलून दखवली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे
सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

इस्लामपूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील बोलत होते. इस्लामपूर येथे एका स्थानिक खाजगी चॅनेलशी संवाद साधताना त्यांनी मनातील ही खदखद बोलून दाखवली आहे. मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष बांधणी आणि आमदारांचे संख्याबळ वाढवणे यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असे पाटील यांनी बोलून दाखविले आहे.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. तरूणांना जर राजकारणात यायचं असेल तर त्यांनी फक्त पोस्टरबाजी करून चालणार नाही. त्यांना जनतेत उतरून काम करावं लागेल, असा सल्ला त्यांनी दिला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: