दारू निर्मिती करणारे शिर्डीचे विश्वस्त कसे? विश्वस्त नेमणुकीवरून वाद होण्याचे चिन्ह

 

नगर | शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळाची घोषणा अद्याप ठाकरे सरकारने केलेली नसली तरी सध्या विश्वस्त मंडळात मद्यनिर्मिती करणारे राष्ट्रवादीचे कारखानदार, विविध प्रकारचे आरोप असणाऱ्या व्यक्तींची नावे समोर आल्याने स्वपक्षीयांकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. तसेच शिवसेना पक्षात विश्वस्त मंडळाच्या नावावरून नाराजी पसरली आहे.

साई संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला, तर उपाध्यक्षपद शिवसेना पक्षाला देण्याचे धोरण ठरल्यानंतर संभाव्य विश्वस्त मंडळाची यादी सोशल मीडियात फिरत आहे. मात्र, जी नावे समोर आली त्यावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप असून त्या नावाला आक्षेप जनतेतून नोंदविण्यात आले आहेत. संस्थानच्या शुद्धिकरणाबाबत न्यायालयीन लढाई लढत असलेले संजय काळे यांनी याबाबत पत्रकच प्रसिद्धीस दिले आहे.

संस्थानच्या विश्वस्त मंडळात कोणत्या व्यक्ती असाव्यात याबाबत न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी नियमावली घालून दिली आहे. मात्र, शासन ही नियमावली व नैतिकता न पाळता दारू निर्मिती करणारे नेते, यापूर्वी अपात्र ठरलेले, न्यायालयाने जामीन नाकारलेले, संस्थानला मालमत्ता विकणारे आदींना विश्वस्त करणार असेल तर तो भाविकांचा अवमान आहे, असे काळे यांनी म्हटले आहे. विश्वस्त मंडळाच्या संभाव्य यादीत शिर्डीतील एकाही स्थानिक शिवसैनिकाचे नाव दिसत नसल्याने सेनेतही नाराजी आहे.

Team Global News Marathi: