मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात २३ ठिकाणी वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी १४ ठिकाणी वसतिगृहे तयार असून त्यांचे लवकरच उद्घाटन होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज दिली.
यामध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर, पुणे, सातारा, मिरज, कोल्हापूर, बीड, लातूर, अमरावती, नागपूर येथे प्रत्येकी एक आणि नाशिक व संभाजीनगर येथे प्रत्येकी दोन वसतिगृहांचा समावेश आहे. उर्वरित ठिकाणी वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात जागा मिळण्याबाबत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱयांबरोबर बैठक होईल.
छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (सारथी) विभागीय केंद्र व जिल्हा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे उपकेंद्र सुरू झाले आहे. पुण्यातील मुख्यालयाच्या बांधकामासाठी ४२ कोटी ७० लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून लवकरच त्या कामाचा शुभारंभ होईल.