पुणे | राज्यात कोरोना संसर्गाने हाहाकार माजलेला असताना कोरोनामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यात मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे चिंतेचे वातावरण संपूर्ण देशात पसरले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट गडद होत असताना दुसरीकडं मात्र केंद्राने इंधन दरवाढ करून सामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. या वाढत्या इंधन दरवाढी विरोधात आज काँग्रेसने संपूर्ण राज्यात आंदोलनाची हाक दिली आहे.
इंधनाची अवाजवी दरवाढ करून मोदी सरकार देशातील जनतेची लूट करत आहे असा आरोप करत काँग्रेसच्या वतीने शहरातील ३५ पेट्रोल पंपांवर एकाच वेळी आंदोलन छेडण्यात आले होते. राज्यात १ हजार ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले. कुलकर्णी पेट्रोल पंपाजवळ जोशी यांच्यासहीत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, नगरसेवक रविंद्र धंगेकर, बाळासाहेब अमराळे व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ते म्हणाले, मोदींच्या कारकिर्दीत पेट्रोलची ३५० टक्के तर डिझेलची ९०० टक्के वाढ झाली. यातून मिळालेले ८० हजार कोटी रूपये कुठे गेले याचा पत्ता नाही. मोदी सरकार देशाची लूट करत आहे हाच याचा पुरावा आहे. मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलनासाठी घोड्याची बग्गी आणली होती. त्यात बसून जोशी व पदाधिकार्यांनी मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्यावी, देशाला विश्वासात घेऊन मोदी यांनी इंधन दरवाढीतून मिळालेल्या पैशांचे काय केले त्याचा खुलासा करावा अशी काँग्रेसची देशपातळीवर मागणी असल्याचे जोशी यांनी सांगितले.