गृहमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? या प्रश्नावर जयंत पाटलांनी दिले उत्तर

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. यावरून आता संपूर्ण विरोधक आघाडी सरकारवर तुटून पडले आहे. तसेच आता विरोधकांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे.

यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख य़ांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाने लावून धरली आहे. पण अनिल देशमुख हे चांगले काम करत असून राजीनामा घेण्याचा कोणताही निर्णय नाही असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

‘दिल्लीमध्ये शरद पवार यांनी बोलावलेली बैठक ही नियोजित होती. महाराष्ट्रात काहीही झालं की विरोधक सरकार बरखास्त करा अशी मागणी करत असतात. आता ते हळूहळू हास्यास्पद होऊ लागले आहे. अनिल देशमुख चांगले काम करत आहे. त्यांच्या राजीनाम्याबद्दल असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. योग्य तो तपास सुरू आहे असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे आयुक्तांनी लावलेल्या आरोपांवर बोलताना पाटील म्हणाले की, कोण अधिकारी आहे, खोलात जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे कुणी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात कोण जबाबदार आहे, मुंबईमध्ये स्फोटकांनी भरलेली कार कुणी ठेवली आहे याचा तपास सुरू आहे. यातूनच परमबीर सिंग यांचे पत्र आले आहे’ असंही जयंत पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: