हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत – संजय राऊत 

 

 

‘आज ‘फादर्स डे’ आहे. ‘फादर ऑफ नेशन’ म्हणजे राष्ट्रपिता. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की या देशाला बाप नाही. मात्र जगात हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत.nज्यांच्या मनामनात आणि रोमारोमात हिंदुत्व आहे तो साहेबांना आपला बापच मानतो.’ असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आज शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात म्हणाले.

 

56 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत ठिणगी टाकली. 56 वर्षात देशभरात त्याचा वणवा झाला. आज त्या वणव्याचा 56 वा वर्धापनदिन आहे, असे संजय राऊत म्हणाले. ‘आतापर्यंत छप्पन झाली आहेत पण पुढे बरेच काही आहे हे विरोधकांनी समजून घेतले पाहिजे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 

‘अयोध्येत आदित्य ठाकरे यांचे मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषात स्वागत झाले. बाळासाहेबांचा वारसदार आला म्हणून साधूसंतांनी त्यांना आशीर्वाद दिले. तो आशीर्वाद आपल्या हिंदुत्वाला होता आणि बाळासाहेबांबद्दलची सद्भावना त्यात होती. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व काय आहे आणि कसे आहे, कोणत्या दिशेने जातेय त्याचे मार्गदर्शन कोणाकडून घेण्याची गरज नाही.’ असा टोला खासदार राऊत यांनी विरोधकांना लगावला.

 

 

राज्यसभेत एक जागा जिंकल्यानंतर घमेंडीने मिरवणाऱया विरोधकांवर संजय राऊत यांनी यावेळी जोरदार टीका केली. या राज्याची सूत्रे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील असे सांगताना ‘तेरा घमंड तो चार दिनका है, हमारी बादशाही तो खानदानी है’ असा सणसणीत शेर त्यांनी मारला. कुणी कितीही तलवारबाजी करू द्या, या बादशाहीला नख लावण्याची हिंमत अजून कोणाची झाली नाही, असे ते म्हणाले.

Team Global News Marathi: