हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेनं पुन्हा डिवचलं, शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी

 

मुंबई | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना पक्षाला टोला लगावला आहे. मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं शिवसेनेवर टीका केली होती. प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला मनसेनं हिंदुत्वाचीच आठवण करुन देत काही सवाल केले आहेत.

त्यातच शिवसेना भवनसमोर मनसेनं लावलेल्या बॅनरमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. मनसेची शिवसेनेविरोधात ही काही पहिली बॅनरबाजी नाही. यापूर्वी देखील मनसेनं शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी करुन शिवसेनेवर टीका केली आहे. मात्र, आता पुन्हा एकदा मनसेनं शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण करुन दिल्याचं दिसतंय. शिवसेना भवनसमोरील मनसेचं हे बॅनर चांगलंच चर्चेत आलंय.

बॅनरमध्ये लिहिलंय की, ‘माननीय बाळासाहेब, बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदू असून हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालतायेत हिंदूंनी लावलेले भोंगे काढताहेत. आपला ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने फक्त आता मा. राजसाहेब ठाकरे चालवत आहेत. जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या. सेनेचं हिंदुत्व हे केव्हाच संपलं आहे बाळासाहेब गेल्यावर हिंदुत्व निघून गेलं. आता सेनेचा रंग हिरवा झाला आहे.’ अशी टीका मनसेच्या बॅनरमध्ये करुन शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण करुन देण्यात आली आहे.

Team Global News Marathi: