शिंदे-फडणवीस यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट तब्बल रात्री २ पर्यंत सुरु होती बैठक

 

नवी दिल्ली | महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत.शुक्रवारी रात्री या दोघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरा दोन वाजता संपली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीत कोणत्या पक्षाला कोणती आणि किती खाती मिळणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे-फडणवीस अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरी नव्या मंत्र्यांच्या शपथविधीसाठी सोमवार उजाडण्याची शक्यता आहे.

अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. मुख्यमंत्री या नात्याने पदभार स्विकारल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री श्री. अमित शाह यांची भेट घेतली. यासमयी त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल ती मदत केंद्र सरकार नक्कीच करेल असे मला आश्वस्त केले, असं त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 आमदारांसह बंड केलं. त्यामुळे राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Team Global News Marathi: