“हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा”; उद्धव ठाकरेंचे शिंदे फडणवीस सरकारला आव्हान

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार तात्पुरते आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणुका घेऊ दाखवा, असे आव्हान दिले.

शिवसेना भवनात जिल्हा प्रमुख यांना संबोधित करताना माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. लढायचे असेल तर सोबत राहा. भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंनी यावेळी घटनातज्ज्ञांना विनंती केली. ते म्हणाले की, आपण घटनातज्ज्ञ आहात. सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा, असे आवाहन करत, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वांना सत्य बोलू द्या. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Team Global News Marathi: