हिंमत असेल तर वांद्रय़ात येऊन दाखवा ! थेट शिवसैनिकांचे राणा दाम्पत्याला आव्हान

 

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थानी असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्याबद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

‘मातोश्री’बाहेर शिवसैनिकांनी कडक पहारा ठेवला आहे. राणा दांपत्याला ‘शिवप्रसाद’ देण्याची जय्यत तयारी त्यांनी केली आहे. मुंबईच्या कानाकोपऱयातून हजारो शिवसैनिक ‘मातोश्री’वर दाखल झाले आहेत. खार येथील राणा दांपत्याच्या घरालाही शिवसैनिकांनी वेढा दिला असून तिथून त्यांना बाहेरच पडू देणार नाही, असा निर्धारही शिवसैनिकांनी केला आहे.

तर दुसरीकडे हजारो पुरुष आणि महिला शिवसैनिक ‘मातोश्री’बाहेर खडा पहारा देत आहेत. आज सकाळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून राणा दांपत्याच्या स्टंटबाजीचा निषेध केला. ‘हिंमत असेल तर वांद्रय़ात येऊन दाखवा’ असे राणा दांपत्याला आव्हान देणारे होर्डिंग्जही ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

राणा दांपत्य इथे आले तर त्यांना असा ‘प्रसाद’ देऊ की पुन्हा शिवसेनेकडे पाहण्याची त्यांची हिंमत होणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. शिवसैनिकांचा आवेश आणि संताप पाहून पोलिसांनीही कलानगरच्या परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

Team Global News Marathi: