‘अरे बघताय काय सामील व्हा’, मनसेची मराठीजनांना साद

मुंबई : राज्यात आगामी महानगर पालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर कसली आहे. त्यात खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीने लक्ष घालून महानगर पालिका असलेल्या शहरात बैठकांचा धडाका लावला आहे. त्यात आता मनसेने सदस्य नोंदणीचा प्रारंभ केला आहे. तसेच सदस्य नोंदणीसाठी विविध वृत्तपत्रात सुद्धा मनसेने जाहिराती दिल्या आहेत.

सदस्यनोंदणी मोहिमेच्या या जाहिरातीमधून ‘अरे बघताय काय सामील व्हा’, अशी मराठीजनांना साद घातली आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली तसेच मिरा-भाईंदर महापालिकांच्या निवडणुका तोंडावर मनसे आता कामाला लागली आहे. तसेच राज ठाकरे यांनी सुद्धा महानगरपालिकांशी संबंधित विभागवार मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन आढावा घेऊन सूचना केल्या आहेत.

आता थेट सदस्यनोंदणी मोहिमेसाठी प्रसारमाध्यमांद्वारे जाहिरातीही दिल्या गेल्या आहेत. करोनाच्या संसर्गामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे कठीण असल्याने प्रसारमाध्यमांची मदत घेतल्याचे दिसून येत आहे. पक्षाच्या या सदस्य मोहिमेत मोबाइलवर स्कॅन करून, संकेतस्थळावर जाऊन किंवा जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन नागरिकांना मनसेचे सदस्य होता येणार आहे. यंदा प्रथमच मनसेने डिजिटल यंत्रणेचा वापर करून सदस्य नोंदणीला प्रारंभ केला आहे.

Team Global News Marathi: