नवी दिल्ली | देशाचे पहिले सीडीएस आणि माजी लष्करप्रमुख बिपीन रावत यांचं अपघाती निधन झालं आहे. तामिळनाडूच्या कुन्नूर येथे हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या हेलिकॉप्टरमध्ये भारतीय वायूसेनेचे आणि लष्कराचे दिग्गज अधिकारी होते. विशेष म्हणजे भारतीयांचा अभिमान असलेले पहिले सीडीएस बिपीन रावत आपल्या पत्नीसह या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते. त्यांच्यासोबत आणखी १२ दिग्गज अधिकारी होते.
या हेलिकॉप्टर दुर्घटनेत रावत दाम्पत्यासह ११ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत बचावलेले एकमेव भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग गंभीर जखमी आहेत. त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. हे. सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, वरुण सिंह यांची शौर्यगाथा थक्क करणारी असून याचवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
बिपीन रावत हे ६३ वर्षांचे होते. रावत हे कुटुंबच प्रचंड शूर. रावत यांचे वडील एल एस रावत हे देखील सैन्यातच होते. त्यांच्या कुटुंबातील अनेकजण सैन्यात होते. रावत यांचं बालपण सैनिकांमध्ये गेलं. देशाची सेवा आणि सुरक्षेसाठी झोकून देणं, स्वत:ला समर्पित करणं हे त्यांच्या रक्तातच होतं.