लढवय्या कोविड योद्धा: आईच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून तीसऱ्या दिवशी आरोग्यमंत्री ऑन ड्युटी

मी माझ्या कार्यात रुजू होणं हीच मातोश्रींना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना व्यक्त करून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तिसऱ्याच दिवशी कर्तव्यावर हजर झाले आहेत. मुंबईत खा शरद पवार यांनी बोलावलेल्या कोविड आढावा बैठकीत ना टोपे अचानक प्रकटले आणि सर्वांना त्यांच्या कर्तव्य परायणतेचे कौतुक वाटले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे 3 दिवसांपूर्वी उपचार सुरू असताना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यामुळे किमान 10 दिवस तरी ते दुखवटा पाळतील अशी शक्यता गृहीत धरण्यात येत होती.

बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी राज्याच्या एकूण कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षाच्या सर्व मंत्र्यांची बैठक ठेवली होती. राजेश टोपे या बैठकीला अनुपस्थित असतील असे गृहित धरण्यात आले होते, मात्र राजेश टोपे आवर्जून या बैठकीला उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेऊन व्यक्तिगत दुःख बाजूला सारून 3 दिवसांचा दुखवटा पाळल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

मंगळवारी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर ता.अंबड जि.जालना येथील कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली. रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचाराबाबत डॉक्टरांशी चर्चा केली.कोविड सेंटरची साफसफाई करून स्वच्छता व पिण्याचे पाणी,जेवण आदी वेळेवर देणेबाबत सूचना केल्या.

वैयक्तिक दुःख कितीही मोठं असलं तरी केवळ तीन दिवसांचाच दुखवटा पाळण्याचा निर्णय टोपे कुटुंबाने घेतला. मी माझ्या कार्यात रुजू होणं हीच मातोश्रींना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे असेही पक्षाच्यावतीने सांगण्यात आले. अंबड येथे ना. राजेश टोपे यांचे लोकांसोबत संवाद साधतानाचे फोटो पक्षाने आपल्या अधिकृत अकौंटवर ट्विट केले आहेत.

कोरोना संकटाच्या काळात राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून सक्षमपणे काम केलेले आहे. त्यांच्या या कामामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य आणि राजकीय, प्रशासकीय लोकही प्रभावित झालेले आहेत. आईच्या निधनानंतर ही दुःख बाजूला सारून टोपे 3 ऱ्या दिवशी कर्तव्यावर हजर झाल्याने त्यांच्या समर्पणभावनेची चुणूक दिसुन आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: