मंदिराच्या लाऊडस्पीकरवर भरते बादोलेची शाळा शाळा बंद शिक्षण मात्र सुरु: शिक्षकाचा अनोखा उपक्रम

मंदिराच्या लाऊडस्पीकरवर भरते बादोलेची शाळा

शाळा बंद शिक्षण मात्र सुरु: शिक्षकाचा अनोखा उपक्रम

सोलापूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग मेटाकुटीला येत अाहे. या महाभयंकर विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शाळेतला किलबिलाट थांबला. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात झाली. एकीकडे शहरी भागातील विद्यार्थी लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून तीन धडे गिरवताहेत तर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पुरेशा सोयी-सुविधांअभावी अॉनलाईन शिक्षणाला मुकत आहेत. यावर पर्याय शोधत एक शिक्षक मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील ५ हजार लोकसंखेचे बादोले हे गाव. येथील के.पी.गायकवाड माध्यमिक शाळा. याच शाळेतील कलाशिक्षक मयुर दंतकाळे यांनी मुलांच्या अभ्यासात खंड पडू नये यासाठी ‘शाळा बंद शिक्षण चालू’ या उपक्रमाअंतर्गत गावातील मंदीराच्या लाऊडस्पीकरवरुन मुलांना पाढे आणि कविता शिकवण्याची संकल्पना सुचली. हा उपक्रम सुरु करण्यासाठी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन या उपक्रमाची कल्पना दिली. यासंदर्भात मंदिराच्या लाऊडस्पीकरवरून मुलांना केवळ अभ्यासक्रमाचे धडे देणार असल्याची हमीपत्र देखील शाळेने दिले.

जूनच्या पहिल्या आठवड्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर गावातल्या मुलांना पुस्तके वाटली. याचदरम्यान शाळेने गावातील किती विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहे याचा सर्व्हे केला. यात केवळ ३० टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन असल्याचे आढळून आले तर इतर विद्यार्थ्यांकडे केवळ कॉलिंगची सुविधा असलेला मोबाईल होता. तर काही पालकांकडे फोन नसल्याचे समोर आले. अशा वेळी मुलांना गावातील मंदिराच्या लाऊडस्पीकरवरून मुलांना शिकवायचे ही संकल्पना मयुर यांना सुचली. या कल्पनेस शाळेतील सहशिक्षकांनी बळ दिले.

ग्रामस्थांनी परवानगी दिल्यानंतर गावातल्या तीन मंदिरावरील लाऊड स्पीकरवरून शाळा सुरू झाली. सकाळी सात ते नऊ या वेळेत शाळा घरीच भरू लागली. शिक्षकेतर कर्मचारी लाऊडस्पीकर लावून मराठी कविता पाढे ऐकवितात.
पाचवी ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला. तर नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुगल मीटच्या माध्यमातून ऑनलाईन क्लास सुरू झाला. ज्या मुलांकडे व्हॉट्सअॅप आहे अशा विद्यार्थ्यांना एमपी३ फॉरमॅटमध्ये अभ्यास पाठवला जातो.

लवकरच विद्यार्थ्यांना एमपी३ फॉरमॅटमध्ये ऑडिओ अभ्यासक्रम पाठवला जाणार आहे. शिक्षणाच्या या नव्या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. कोरोना साथीत देशभरातल्या शाळा बंद असताना मयुर यांनी बादोलेच्या मुलांसाठी निराळे प्रयोग केले आणि आणि मुलांना शाळाबाह्य होण्यापासून रोखलं.

कोट

विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

‘शाळा बंद शिक्षण चालू’ या उपक्रमा अंतर्गत सुरू केलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गावकर्‍यांच्या सहकार्यामुळे हे सारे शक्य झाले. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये हा उपक्रम सुरू करण्यापाठीमागचा उद्देश आहे. हा उपक्रम सुरू केल्यामुळे गावात उत्साहाचे शैक्षणिक वातावरण तयार झाले अाहे. शाळेचे मुख्याध्यापक सुनील गुमास्ते, अध्यक्ष मल्लिनाथ बगले, सचिव माधव कुलकर्णी, महादेव सोनकर, कैलास गायकवाड, नागनाथ धर्मसाले तसेच माजी विद्यार्थी यांनी विशेष सहकार्य केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: