…वह योगी कैसा ? राहुल गांधी यांनी साधला योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा !

 

उत्तर प्रदेश निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना सत्तेत असलेल्या योगी सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्व विरोधकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण सध्या गरम असून ते दिवसेंदिवस अधिक तापण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एकीकडे राज्याचा विकास केला असल्याचा दावा करुन लोकांना आपल्याबाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर विरोधक योगींच्या विकासकामातील त्रुटी जगासमोर आणून त्यांचं पितळ उघड करून खोटेपणा लोकांसमोर आणत आहेत. अलिकडेच योगी आदित्यनाथ सरकारची एक जाहिरात वादग्रस्त ठरलीये तर दुसरीकडे योगींचं ‘अब्बाजान’ हे वक्तव्य चर्चेचं ठरलं आहे. यासंदर्भातच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर टीका करत म्हटलंय की, जो नफ़रत करे, वह योगी कैसा! या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी थेट योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांचं सरकार हे थेट मुस्लिम-दलित अल्पसंख्यांकाच्या मुळावर उठल्याचा आरोप विरोधकांचा आहे. मुख्यमंत्री थेटपणे मुस्लिम द्वेषाचं समर्थन करतात, अशी टीका विरोधकांची आहे. राहुल गांधींच्या या टीकेला योगींच्या अलिकडील एका वक्तव्याचा संदर्भ आहे.

Team Global News Marathi: