“हे मुख्यमंत्री की टोळीप्रमुख?”, मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर

 

एक कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर निशाणा साधत घणाघाती टीका केली होती. तसेच अभिजात भाषेचा दर्जा देण्याची केंद्र सरकारची लायकी आहे का?, असा खोचक सवालही यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या टीकेवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले असून हे मुख्यमंत्री की टोळीप्रमुख?, असा सवालही त्यांनी केला आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की कुठल्या टोळीचे प्रमुख म्हणून बोलताय? हे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला घराच्या बाहेर पडले नाहीत. परंतु एका खासगी कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. हा काय प्रकार आहे’, असे भातखळकर म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची यांची तरी लायकी आहे का? तिकडे कोणी व्यक्ती नाही तर केंद्र सरकार आहे. त्यांचे काही नियम आहेत. त्यामुळे खालच्या पातळीवर जाऊन हे मुख्यमंत्री नेहमीच बोलत असतात. त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की ते कायम पक्षप्रमुखाच्याच भूमिकेत आहेत. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या गोष्टीची पूर्तता केली. याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे’, असेही भातखळकर यावेळी म्हणाले.

Team Global News Marathi: