हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? मतदानावरून संजय राऊतांनी डागली तोफ

 

मुंबई | विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून जवळपास अधिक आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपचे आजारी असलेले आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हेही मतदानासाठी विधानभवनात आले आहेत. त्यावरुन, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. मलिक-देशमुखांना मतदानाची परवानगी नाही, पण रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू असलेले आमदार मतदानासाठी येत आहेत, हे भेदाभेदीचेच राजकारण असल्याचं राऊत यांनी म्हटलंय.

ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. राज्यसभेनंतर आता विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठीही पुन्हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

त्यावरुन, संजय राऊत यांनी भाजपचे राजकारण अघोरी आणि अमानुषी असल्याचं म्हटलंय. मलिक-देशमुखांना मतदानाची परवानगी नाही, हे भेदाभेदीचेच राजकारण. पण त्याच वेळेला लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक या दोन आजारी आमदारांना अत्यंत नाजूक स्थितीत मतदानास उचलून आणले जाते. हे दोन्ही आमदार कर्करोगाशी झुंजत आहेत. व्हेंटिलेटरवर त्यांचा श्वास आहे असे म्हणतात, पण राजकीय स्वार्थ असला की, माणुसकी तुडवून त्यांना स्ट्रेचर व व्हीलचेअरवर मतांसाठी आणले जाते, असे राऊत यांनी म्हटले.

Team Global News Marathi: