‘हर हर महादेव’ बाबत राज ठाकरेंचे मनसेच्या प्रवक्त्यांना महत्त्वाचे आदेश

 

‘हर हर महादेव’ या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे, असा आरोप सध्या अनेक नेते करत आहेत. ऐतिहासिक सिनेमांमध्ये विपर्यास केल्यावरुन आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड थेट ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात पोहोचले आणि त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद केला. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना या चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाला राष्ट्रवादीकडून जातीय रंग दिला जात असल्यानं काहीच न बोलण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे यांचे मत आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत.

हर हर महादेव या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे हे आज चित्रपटाबाबत भूमिका मांडणार आहेत. आज 11 वाजता अभिजित देशपांडे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये अभिजित देशपांडे कोणती मतं मांडतील, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ‘हर हर महादेव चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे, असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता.

ते म्हणाले होते, ‘या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे. हे असे चित्रपट आपण लोकांपुढे घेऊन जायचे? सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं, आपल्याला आधिकार दिले आहेत, म्हणून आपण चित्रपटात काही पण दाखवाचं? सिनेमॅटिक लिबर्टी असली तरी इतिहासाचा गाभा सोडून कसे काय हे लोक चित्रपटाची निर्मिती करत आहेत?’

Team Global News Marathi: