आदित्य ठाकरे औरंगाबादच्या पैठण दौऱ्यावर, आक्रोश मेळाव्यात होणार सहभागी

 

औरंगाबाद दौऱ्यावर असलेले युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहे. सोबतच शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहे. आदित्य ठाकरे यांनी काल सिल्लोडमध्ये नुकसानीची पाहणी केली, त्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा घेतला.

दरम्यान श्रीकांत शिंदे आणि अब्दुल सत्तार यांची देखील सिल्लोडमध्ये सभा झाली, ज्यातून त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. त्यामुळे आज आदित्य ठाकरे त्यांना काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहे. आज आदित्य ठाकरे पैठण तालुक्यातील डोणगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती सुद्धा घेणार आहे.

बालानगर या गावात आदित्य ठाकरेंचा संवाद मेळावा देखील होणार आहे. यासाठी स्टेज देखील उभारण्यात आला आहे. सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा मेळावा होणार असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे. औरंगाबादच्या पंढरपूर परिसरात आज ठाकरे गटाकडून सरकारच्या विरोधात आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या मेळाव्यात आदित्य ठाकरे स्वतः सहभागी होणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या योजना,शेतकरीप्रश्न, ओला दुष्काळ आणि विकास कामांवरून आदित्य ठाकरे निशाणा साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आक्रोश मेळाव्यातून आदित्य ठाकरे कोणावर हल्लाबोल करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Team Global News Marathi: