नवी दिल्ली | गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून पाटीदार समाजाचे वजनदार नेते आणि काँग्रेसचे गुजरातमधील कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल बंडखोरीच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. गुजरातमधील काँग्रेस नेतृत्वावर आपण नाराज असून, पक्षात काम करून दिले जात नसल्याचा दावा हार्दिक पटेल यांनी केला आहे.
आपण प्रभू श्रीरामांना मानत असून, रामभक्त असल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. तसेच वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ ४ हजार भगवद्गीता वाटप करणार आहेत. हिंदू असल्याचा गर्व असून राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. याबाबत चिंतन केले जाईल आणि लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही हार्दिक पटेल यांनी म्हटले होते.
त्यानंतर, आता हार्दीक पटेल यांनी व्हॉट्सअपला एक नवीन डीपी ठेवला असून यात ते भगवा गमछा परिधान करुन दिसत आहेत. विशेष म्हणजे आपल्या व्हॉट्अप बायोमधून त्यांनी काँग्रेसला गायब केल्याचं दिसून येत आहे. सध्या ते गुजरातमधील काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं दिसून येत आहे. अशातच हार्दिक पटेल भाजपच्या मार्गावर असल्याचे बोलले जात असून हा काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.