“हनुमान चालिसा जरूर म्हणा; पण मशिदींसमोर जाऊन गळा काढू नका”

 

देशाचा कारभार संविधानाने चालतो. त्यामुळे भोंगे काढण्याची, वाजविण्याची भाषा करून समाजासमाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करता कामा नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. राज ठाकरे यांच्या अयोध्येला जाण्यास विरोध नाही; परंतु उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागितली पाहिजे. भगवा रंग शांततेचे प्रतीक आहे. अंगावर भगवा घेतल्यावर वाद करता कामा नये, असेही आठवले यावेळी म्हणाले.

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देवळाली कॅम्प येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सभेत आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे होते. यावेळी आठवले यांनी सध्या देशात सुरू असलेल्या भोंगे आणि अयोध्या प्रकरणावरून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यास विरोध नाही; परंतु उत्तरभारतीयांची माफी मागावी, धर्मा धर्मात तेढ निर्माण करू नये कारण भगवा रंग हा गौतम बुद्धांचा आहे.

तसेच बुद्ध व भगवा रंग शांततेचा आहे. ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालिमीत तयार झालेले असल्याने वाद करण्यापेक्षा वाद मिटविण्याचे काम त्यांनी केले पाहिजे. अंगावर भगवा घेतल्यावर वाद नको, असा सल्लाही त्यांनी दिला. रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी एकत्र आल्यास पक्षाचे प्रतिनिधित्व दिल्लीसह राज्यात निर्माण होईल. यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारायला आपण तयार आहोत, शिवाय आपला प्रवास पँथर ते रिपब्लिकन पार्टी असा झालेला असून रक्ताच्या शेवटपर्यंत रिपाइंच राहू, असे त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: