सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यातील राजकारण चांगलेच तापू लागले होते. आरक्षणासाठी अडथळा ठरत असलेल्या 102 व्या घटना दुरुस्तीसंदर्भात आता केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र दुसरीकडे आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झालेली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते आणि मराठा आरक्षणासाठी लढणारे विनोद पाटील यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत जोरदार वाद झालेले पाहायला मिळाले आहे.
सध्या विनोद पाटील आणि सदावर्ते या दोघांमधील चर्चेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विनोद पाटील यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत असून, यात ते सदावर्ते यांच्यावर चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आहेत. मराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. संविधानिक भाषेमध्ये चर्चा असेल तर जरूर करू, चुकीचे भाषा सहन करणार नाही, अशा शब्दात विनोद पाटील यांनी सदावर्ते यांना खडेबोल सुनावले आहे.
आम्हाला माजुर्डे म्हणायचे आणि आम्ही विरोध करायचा नाही हे योग्य आहे काय?, याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे का, हे ऐकणारी मराठ्याची औलाद नाही. गुणरत्न सदावर्ते नीट बोल, संविधानिक भाषेत बोल. माजुर्डेपणाची ही भाषा मी तोंडावर ऐकून घेणार नाही, असे त्यांनी सुनावले आहे. आता विनोद पाटील यांच्या या व्हिडिओ नंतर अनेकांनी सदावर्ते यांच्यावर रोष दाखवला आहे.