गुजरातमधील अवैध मंदिर पाडल्याने ११०० भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामा देत व्यक्त केला संताप

 

गुजरातमधील नवसारी भागात असलेलं एक मंदिर जिल्हा विकास प्राधिकरणाने पाडलं आहे. मंदिर अवैध असल्याने त्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. हे मंदिर पाडल्याने तिथलं वातावरण हे तापलं आहे. सर्वोदय सोसायटीमधील राधाकृष्ण मंदिर तोडण्यात आलं आहे. याचा निषेध करत भाजपच्या जवळपास 1100 कार्यकर्त्यांनी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मंदिराविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा तसेच तोडकामावेळी महिला आणि लहान मुलांना झालेल्या मारहाणीचा काँग्रेस आणि आप या पक्षांनी विरोध केला आहे.

25 जुलै रोजी जिल्हा विकास प्राधिकरणाने नवसारी येथील एक मंदिर जमीनदोस्त केलं. हे मंदिर अवैधरित्या बनवण्यात आलं होतं. या कारवाईचा स्थानिकांनी आधीपासून विरोध केला होता, मात्र या विरोधानंतरही ही कारवाई करण्यात आली होती. याचा राग आल्याने भाजपच्या 1100 कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे नवसारीचे भाजप अध्यक्ष भुरालाल शाह यांच्याकडे सोपवले.

हे राजीनामे मिळाल्यानंतर शाह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की आम्हाला जवळपास 1100 कार्यकर्त्यांचे राजीनामे मिळाले असून त्यातले सक्रीय कार्यकर्ते किती आहेत हे तपासलं जात आहे. भाजपचा या कारवाईशी काहीही संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. काँग्रेस आणि आपने मंदिरावर करण्यात आलेल्या कारवाईचा विरोध करणाऱ्यांसोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Global News Marathi: