गुजरात विजयानंतर भाजपा मंत्र्यांचं मुंबई मनपा निवडणुकीसंदर्भात सूचक विधान

 

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा मतदार संघ असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू हाती येत आहेत. पहिल्या दोन-तीन तासांच्या मतमोजणीत सुरूवातीच्या कलांनुसार भाजपाने विक्रमी मुसंडी मारल्याचे दिसत आहे. गेल्या निवडणुकीत धक्कादायकरित्या जागा कमी झाल्यानंतर, या निवडणुकीत भाजपाने भलतीच गरूडझेप घेतल्याचे चित्र आहे. १४०+ चा नारा देणारा भाजपा, गुजरातमध्ये हळूहळू दीडशतकापार पोहोचल्याचे चित्र दिसून येत आहे.

मात्र आद्यपही अंतिम निकाल अद्याप हाती आलेले नसले तरीही राज्यात भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता येणार हे स्पष्ट आहे. अशा वेळी भारतीय जनता पक्षाचे नेते, पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मात्र, उद्धव ठाकरे आणि मविआला थेट इशाराच दिला आहे. गुजरात ही फक्त नांदी असून मुंबई मनपामध्येही असंच घडेल असे ते म्हणाले आहे.

“पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या निर्णयक्षमता, कार्यकुशलता यांस आम्हा भाजपा कार्यकर्त्यांचा प्रणाम. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० दिवसांपेक्षा जास्त वेळ तेथे राहून प्रचार केला, गुजरातमधील कार्यकर्त्यांनी देखील परिश्रम घेतले, त्याचाच हा विजय. मोदीजींवर गुजरातच्या जनतेने श्रद्धा दाखवली आहे. एक नवा इतिहास सुरू झाला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आज गुजरातमध्ये एकहाती विक्रमी विजय मिळवला जात आहे. गुजरातमध्ये जे काही घडलंय तेच उद्या मुंबई महानगर पालिकेमध्ये घडणार आहे. ही फक्त नांदी आहे, सर्वांनी ऐकून घ्या,” असा इशारा देत मंगलप्रभात लोढा यांनी पालिका निवडणुकांवरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला डिवचले.

Team Global News Marathi: