गुजरात निवडणूकीत भाजपला मोठा फटका बसणार; अनेक नागरिक भाजपवर नाराज ?

 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध मुद्‌द्‌यांवरून जनमत जाणून घेतले जात असून आता सीएसडीएस- लोकनितीने काही मुद्‌द्‌यांच्या अनुशंगाने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष समोर आले आहेत. त्यानुसार गुजरातमधील निम्मा मुस्लिम समाज राज्य सरकारच्या कारभारावर नाराज असल्याचे सांगितले जाते आहे.

गुजरात सरकारने युवकांसाठी केलेल्या कामगिरीला 49 टक्के युवकांनी उत्तम म्हटले आहे. तर 40 टक्के युवकांनी सरकारबद्दल असमाधान व्यक्त केले आहे. 11 टक्के युवकांनी काही भाष्य करण्याचे टाळले आहे. तसेच राज्य सरकारने महिलांच्या हितासाठी केलेल्या कामाबद्दल समाधानी आहात का, असा प्रश्‍न विचारल्यावर 56 टक्के महिलांनी होय असे उत्तर दिले आहे. राज्यात महिला मतदारांची संख्या 57 टक्के आहे.

या सर्वेक्षणात जवळपास निम्मे मुस्लिमांनी सरकार त्यांच्या हिताचे रक्षण करण्यात अयशस्वी ठरले असल्याचे म्हटले आहे. गुजरातच्या एकूण लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण 10 टक्के आहे. या समुदायातील चार पैकी एका व्यक्तीने सरकारच्या कामाबद्दल काही उत्तर देण्यास नकार दिला आहे. राज्याच्या विधानसभेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व कमी होत चालले आहे हेही या नाराजीमागचे कारण मानले जाते.

1980 मध्ये गुजरात विधानसभेत 12 मुस्लिम आमदार होते. मात्र गेल्या निवडणुकांमध्ये केवळ दोनच मुस्लिम आमदार निवडुन आले आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 40 टक्के आदिवासींनी सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नसल्याचे नाराजी व्यक्त केली आहे. तर प्रत्येक 10 व्यक्तींमागे तिघांनी काही मत मांडण्यास नकार दिला. राज्यात आदिवासींची संख्या 14.8 टक्के आहे.

Team Global News Marathi: