गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच राहुल गांधी मैदानात

 

:गुजरातच्या रणधुमाळीत राहुल गांधी आज, सोमवारी पहिल्यांदा उतरणार आहेत. महाराष्ट्रात 14 दिवस यात्रा केल्यानंतर भारत जोडो यात्रेचा आज विश्रांतीचा दिवस आहे.आजच्या दिवशी राहुल गांधींच्या दोन सभा गुजरातमध्ये होणार आहेत. दुपारी 2 वाजता सुरतमध्ये तर संध्याकाळी 4.15 वाजता राजकोटमध्ये राहुल गांधींची सभा होणार आहे. या सभांमध्ये राहुल गांधी पंतप्रधानांनी केलेल्या कालच्या वक्तव्यावर काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत राहुल गांधींचे नाव न घेता काँग्रेस नेते आणि भारत जोडो यात्रेवर निशाणा साधला होता. मोदी म्हणाले होते, ‘तीन दशकांपासून नर्मदा धरण प्रकल्प रखडवलेल्या एका महिलेसोबत काँग्रेसचा एक नेता पदयात्रा काढताना दिसला.’ नर्मदा धरणाच्या विरोधात असलेल्यांच्या खांद्यावर हात ठेवून तुम्ही पदयात्रा काढताय, असा सवाल काँग्रेसला विचारा, असं देखील पंतप्रधान म्हणाले. नर्मदा धरण बांधले नसते तर काय झाले असते? असा सवाल देखील त्यांनी केला होता.

सोमवारी राहुल गांधी हे हेलिकॅप्टरने औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर औरंगाबाद विमानतळावरून खाजगी विमानाने गुजरातला जाणार आहेत. दरम्यान गुजरातमध्ये त्यांच्या सभा होणार आहे. तर गुजरात येथील सभा आटोपून विमानाने राहुल हे पुन्हा औरंगाबाद विमानतळावर परततील. पुढे औरंगाबाद विमानतळावरून खाजगी वाहनाने कमळनुरीला जाणार आहेत. यावेळी रस्त्यात औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी बस स्थानक येथे संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे. याबाबत औरंगाबाद काँग्रेसकडून माहिती देण्यात आली आहे.

Team Global News Marathi: