गोपीचंद पडळकरांवर मारामारी, दरोडा, ऍट्रॉसिटीसह ३२ गुन्हे गृह राज्यमंत्र्यांनी केली पोलखोल

 

मुंबई | लोकांसाठी काम करताना हे गुन्हे दाखल करण्यात आले होते, असा कांगावा करणाऱया भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांची गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सोमवारी विधान परिषदेत पोलखोल केली. गोपीचंद पडळकर यांच्यावर मारामारी, सरकारी नोकरावर हल्ला, दरोडा, ऍट्रॉसिटी असे 9 गंभीर गुन्हे दाखल असून त्याची यादी वाचून दाखवली. २००९ पासून त्यांच्यावर एकूण ३२ गुन्हे दाखल असल्याचे सांगत गृहराज्यमंत्री देसाई यांनी पडळकर यांना चांगलाच दणका दिला.

विधान परिषदेत २६० अन्वये कायदा आणि सुव्यवस्थेवर गेले तीन दिवस चर्चा झाली. विरोधकांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवत सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. त्याला आज गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर सभागृहात आपल्यावर केवळ राजकीय गुन्हे दाखल असल्याचे सांगत सभागृहाची दिशाभूल करत असलेल्या पडळकर यांनाही गृहराज्यमंत्र्यांनी चांगलेच उघडे पाडले.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केवळ राज्यातच गुन्हे दाखल नाही तर शेजारच्या कर्नाटक राज्यातही गुन्हा दाखल आहे. हा परराज्यातील गुन्हा असल्यामुळे मला तो ऑन रेकॉर्ड सभागृहासमोर सांगता येणार नाही. त्यावर भाष्य करणे बरोबर नव्हे. आम्ही कर्नाटक सरकारकडून जरूर ती माहिती मागवू, असे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सभागृहाला सांगितले.

Team Global News Marathi: