गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण करणार, एकनाथ शिंदेचे आश्वासन

 

मुंबई | मुंंबई-गोवा महामार्गाचे काम मागच्या अनेक वर्षांपासून रखडले असताना आतापर्यंत हे काम करणाऱ्या दोन्ही कंपन्यांना बदलण्यात आले असून नवीन कंत्राटदार कंपन्यांमार्फत हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.

तारांकित प्रश्नावरील चर्चेत शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले. इंदापूर ते रत्नागिरीच्या हद्दीपर्यंतचा रस्ता अतिशय खराब आहे. हा महामार्ग कधी तरी पूर्ण होईल का आणि कधी होणार, असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर शिंदे यांनी सांगितले की, मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला दोन कंत्राटदारांमुळे विलंब झाला.

तसेच आता या कंत्राटदारांना बँकेचे कर्ज देण्यापर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मदत केली. आताही गरज पडल्यास आपण गडकरी यांच्याशी चर्चा करू. मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी रस्ते चांगले आहेत; पण पनवेल ते इंदापूरपर्यंतचे काम खराब आहे. आता नवीन कंत्राटदार नियुक्त केला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या संदर्भात प्रशांत ठाकूर, संजय पोतनीस, भास्कर जाधव, सुनील राऊत, अजय चौधरी व अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी लेखी उत्तर दिले. त्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल-इंदापूर या ८४ किमी लांबीच्या चौपरीकरणाचे काम केंद्र सरकारच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या रस्त्याचे काम बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर हाती घेण्यात आलेले काम संथगतीने सुरू आहे, अशी माहिती लेखी उत्तरात दिली आहे.

Team Global News Marathi: