घाटकोपर – मानखुर्द उड्डाणपुलाच्या नामकरणाचा प्रस्ताव नव्हता, राहुल शेवाळे यांचे स्पष्टीकरण

मुंबई | घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या नामकरणावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा आमनेसामने आले आहेत. या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुल असे नाव सुचवले असताना खासदार राहुल शेवाळे यांनी ख्वाजा गरीब नवाब यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. यामुळे सेना आणि भाजपमध्ये वाद सुरु झाले आहेत. पुलाच्या नामकरणावरुन बराच वाद झाला आहे. उड्डाणपुलाच्या नामकरणावरून सुरू असलेल्या वादाबाबत खासदार राहुल शेवाळे यांनी निवेदन जारी करत अशा नावाचा प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले आहे. तसेच इतर महापुरषांच्या नावानेही प्रस्ताव आले नसल्याचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.

काय लिहिले आहे निवेदनात वाचा !

सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र!

लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेच्या विविध प्रकारच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविणे, हे माझे कर्तव्य आहे. घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या नामकरणाबाबतही तिथल्या स्थानिकांची मागणी केवळ सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम मी केले. या उड्डाणपुलाला नेमके काय नाव द्यायचे, याचा अंतिम निर्णय मुंबई महानगरपालिकेकडून यथावकाश घेतला जाईलच.

वास्तविक, हा उड्डाणपूल माझ्या दक्षिण-मध्य लोकसभा आणि खासदार मनोज कोटक यांच्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या सीमेवर आहे. सदर उड्डाणपुलाचे, ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुल’ असे नामकरण करण्याची मागणी गेल्या वर्षीच केली होती, असा दावा खासदार मनोज कोटक यांनी केला आहे. या मागणीबाबत यापूर्वी प्रसिद्धिमध्यमाध्यम किंवा इतर ठिकाणी फारशी वाच्यता झाली नसल्याने, याबाबत मी अनभिज्ञ होतो. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असून त्यांच्या नावाला कोणताही विरोध करण्याचा प्रश्नच नाही. खासदार कोटक यांच्या मागणीबाबत याआधीच मला माहिती असती, तर नव्या नावाचा प्रस्ताव पुढे आलाच नसता. तसेच स्थानिक नगरसेवक विठ्ठलजी लोकरे यांनी सदर उड्डाणपुलाचे नाव ‘वीर क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे’ यांचे नाव द्यावे, अशी मागणी यापूर्वीच केलेली आहे. याशिवाय काही लोकप्रतिनिधींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव सदर उड्डाणपुलासाठी सुचविले आहे. मात्र, यापैकी कोणाचाही प्रस्ताव माझ्याकडे न आल्याने मला याबाबत माहिती नव्हती. या सर्व महापुरुषांविषयी मला नितांत आदर आहे.

मात्र, केवळ स्वार्थासाठी या साऱ्या प्रकरणाबाबत गैरसमज निर्माण करून, याला धार्मिक रंग देऊन अतिशय हीन राजकारण करण्याचा प्रयत्न काही राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहेत, ही खेदाची बाब आहे.

या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन समाजात असंतोषाचे वातावरण तयार करणाऱ्यांना माझा इशारा आहे की जनता तुमच्या या स्वार्थी राजकारणाला बळी पडणार नाही! वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून बाळकडू मिळालेल्या आम्हाला हिंदुत्व म्हणजे काय, हे कोणाकडून नव्याने शिकण्याची गरज नाही!

विनाकारण या विषयाबाबत सुरू असलेला संभ्रम थांबवून आपण सर्वांनी एकत्रितपणे आपल्या समोर उभ्या राहिलेल्या कोरोना संकटाचा मुकाबला करूया, अशी नम्र विनंती मी आपणास करतो!

जय महाराष्ट्र!!

– खासदार राहुल शेवाळे
(दक्षिण- मध्य मुंबई)

Team Global News Marathi: