“घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचे कल्याण होत नाही” – राहुल गांधी

 

नवी दिल्ली | महागाई वाढत असतानाच नोकरदार लोकांना केंद्रातील मोदी सरकारने मोठा धक्का दिला आहे. केंद्र सरकारने नोकरदार लोकांचा रिटायरमेंट फंड असलेल्या ईपीएफओच्या व्याजदरावर कात्री चालवली. २०२१-२२च्या ईपीएफसाठी सरकारने ८.१ टक्के व्याजदराला मान्यता दिली आहे. हा गेल्या ४ दशकांमधील सर्वात कमी व्याजदर आहे. याचा ५ कोटी ईपीएफओच्या सदस्यांना फटका बसणार आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“लोक कल्याण मार्ग पत्ता (पंतप्रधान निवास) ठेवून लोकांचे कल्याण होत नाही” असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “घराचा पत्ता ‘लोक कल्याण मार्ग’ ठेवल्याने लोकांचे कल्याण होत नाही. साडेसहा कोटी कर्मचाऱ्यांचे वर्तमान आणि भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी पंतप्रधानांनी ‘महागाई वाढवा, कमाई कमी करा’ हे मॉडेल लागू केले आहे” असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी एक ग्राफ देखील शेअर केला, जो २०१५-१६ मध्ये ईपीएफ वर ८.८ टक्के व्याजदर होता, जो आता ८.१ टक्क्यांवर आला आहे.

शुक्रवारी प्रसिद्ध ईपीएफओ कार्यालयाच्या आदेशानुसार कामगार मंत्रालयाने ईपीएफ योजनेच्या प्रत्येक सदस्याला २०२१-२२ साठी ८.१ टक्के व्याजदर क्रेडिट करण्यासाठी केंद्र सरकारी मान्यता मिळाल्याची माहिती दिली आहे. कामगार मंत्रालयाने मान्यतेसाठी वित्त मंत्रालयाकडे तसा प्रस्ताव पाठवला होता. सरकारच्या मान्यतेनंतर आता ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये आर्थिक वर्षासाठी निश्चित दराने व्याज जमा होण्यास सुरुवात होईल. हा व्याजाचा दर ८.१ टक्के दर १९७७-७८ नंतर सर्वात कमी आहे. त्यावेळी व्याजदर ८ टक्के एवढा होता.

Team Global News Marathi: