‘घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो! – सामना

 

एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीनं राज्यात सरकार स्थापन करत मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वीकारली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु यानंतर राज्यातील सत्तासंघर्ष न्यायालयात पोहोचला आहे. यावरून शिवसेनेने टीका करत या प्रकरणात काय घडले की, आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो! अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे. त्यांना आता मळमळत आहे, असे म्हणत जोरदार निशाणा साधला.

क्रांतीच्या वल्गना केल्या व आता भीतीपोटी वांती सुरू झाली. शिंद्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकुन नाही. औटघटकेच्या सरकारसाठी ‘स्ट्रेचर’ व अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरेच काही पाहायचे आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचे बळ देवो, असेही शिवसेनेने म्हटलेय. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर टीकेचा बाण सोडला.

गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राची राजकीय प्रकृती बिघडलीच होती, पण ज्यांच्या फुटीरतेच्या किंवा विश्वासघाताच्या ‘डायरिया’मुळे राज्याची प्रकृती खालावली ते मुख्यमंत्री शिंदेही आजारी पडल्याचे वृत्त अलिबाबा आणि चाळीस चोरांसाठी चिंताजनक आहे. मनुष्यप्राणी व त्याचे शरीर म्हणजे एक यंत्र आहे. त्यात अधूनमधून बिघाड होणारच, पण शिंदे हे किमान २० ते २२ तास न झोपता काम करतात.

तसंच त्यांच्या कामाचा उत्साह व उरक दांडगा आहे. कोणताही व्हायरस त्यांच्या अवतीभवती फिरत नाही. तरीही मुख्यमंत्री शिंदे आजारी पडावेत हे त्या ‘चाळीस’ जणांसाठी चिंताजनक आहे. शिंदे यांना नक्की कोणता आजार जडला आहे हे त्यांनाच माहीत, पण सर्वोच्च न्यायालयात सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्यामुळे अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे, असे म्हणत शिवसेनेने टोला लागवला.

‘आमचीच शिवसेना खरी’ असा दावा त्यांनी केला. हा विनोदाचा भाग झाला. उद्या शिंदे व त्यांचे लोक ग्वाल्हेरला जातील व जिवाजी राजे शिंदे यांच्या सर्व मालमत्तेवर हक्क सांगतील. ”तुम्ही कसले शिंदे? तुम्ही कसले सरदार? तुम्ही अशी काय मर्दुमकी गाजवली? मीच खरा शिंदे. त्यामुळे ग्वाल्हेरचा राजा मीच!” असा दावा करायलाही हे लोक कमी करणार नाहीत व त्यांची मानसिक अवस्था पाहता असे दावे ते करू शकतात, असेही त्यांनी म्हटलेय.

 

Team Global News Marathi: