‘ मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय’ काँग्रेसचे वाढत्या महागाईविरोधात आंदोलन

 

देशात काही दिवसांपासून वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. महागाईमुळे देशातील जनता त्रस्त असताना केंद्र सरकारला जनतेचे सोयरसुतक नाही. जीवनावश्‍यक वस्तूंवर देखील आता जीएसटीच्या माध्यमातून कर लादला जात असल्याने मोदी सरकारच्या निषेधार्थ जिल्हा कॉंग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी भाजून निषेध केला.

देशातील जनतेचे कंबरडे आधीच महागाईने मोडले आहे. गॅस, पेट्रोल आणि डिझेल यांचे दर गगनाला भिडले असून आता सरकारने खाण्याच्या वस्तूंवर देखील जीएसटी लावला आहे. विशेषतः या देशातील सर्व रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना देखील जीएसटी द्यावा लागणार आहे. उपचारावर जीएसटी लावण्याचे पाप केंद्र सरकारने केले असून जनता आता त्रस्त झाली आहे.

या सरकारला महागाईचे सोयरसुतक नसून सरकारमधील काही मंत्री महागाई वाढत असेल तर खाणे पिणे बंद करा, असे संतापजनक वाक्‍य वापरून जनतेच्या भावनांचा खेळ करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया आंदोलकर्त्यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव यांनी व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी भाजून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, कॉंग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.

Team Global News Marathi: