रोज सकाळी उठून कांगावा करू नये संजय राऊतांवर देवेंद्र फडणवीसांनी साधला निशाणा !

देशाला सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून देशभरात आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यादरम्यान केंद्राकडे महाराष्ट्र राज्य मदत मागत असून यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविरचा पुरवठा करण्याची मागणी प्रामुख्याने करत आहेत. त्यातच केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरु झालेली पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता खासदार संजय राऊतांना टोला लगावला आहे.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांचा उल्लेख न करता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अप्रत्यक्ष टीका केली आहे. यावेळी केंद्राकडून राज्याला देण्यात आलेल्या मदतीची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रेमडेसिविरचा मोठा साठा महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मिळाला आहे. केंद्र सरकारने साडे सतराशे मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला दिला आहे. जे बोलघेवडे लोक केंद्र सरकारवर सातत्याने बोलतात त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, इतर राज्यांपेक्षा दुप्पट कोटा केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिला आहे.

तसेच आज मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर दिले आहेत. हवाई दलाच्या माध्यमातून आजही महाराष्ट्रात इतर गोष्टी पोहोचल्या असल्यामुळे जे कांगावेखोर आहेत, त्यांना माझी विनंती आहे, लोक दु:खात असून केंद्र सरकार मदत करत आहे. राज्याला केंद्राची मदत मिळत असून रोज सकाळी उठून कांगावा करु नये, अशी अप्रत्यक्ष टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करुन देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्येही जाहीर केले असल्यामुळे राज्यांवर याचा भार नाही असे विधान सुद्धा त्यांनी केले होते.

Team Global News Marathi: