मुंबई | कोरोना संसर्गाचे गडद संकट आणि इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एक डिसेंबरपासून कमर्शिअल सिलिंडरच्या दरात तब्बल १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मागच्या महिन्यात ऐन दिवाळीत कमर्शिअल सिलेंडरच्या दरात २६६ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. म्हणजेच दोन महिन्याच्या आत कमर्शिअल गॅसच्या किंमतीमध्ये ३६६ रुपयांची वाढ झाली आहे. लासादायक बाब म्हणजे, घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपयांवर कायम आहे.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला इंधन कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दराचा आढावा घेतला जातो. या आढाव्यात एलपीजी सिलिंडरचे दर कमी करावे की त्यात वाढ करावी याबाबत निर्णय घेतला जातो. बैठकीनंतर प्रत्येक कंपनीकडून दर महिन्याच्या एक तारखेला व्यावसायिक आणि एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर केले जातात. काही वेळेस दर कायम ठेवले जातात.
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कमर्शिअल सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तर विनाअनुदानित सिलेंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. आज वाढवण्यात आलेल्या कमर्शिल गॅसच्या किंमतीनंर महागाईचा भडका उडाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये १९ किलो वजनाच्या कमर्शिअल सिलेंडरची किंमत २१०१ रुपये इतकी झाली आहे. मुंबईमध्ये १९५० रुपयांना मिळणारा कमर्शिअल सिलेंडर आता २०५१ रुपयांना मिळेल.