गद्दारी करणाऱ्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा धक्का, केली पक्षातून हकालपट्टी

 

शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक नेत्यांनी पक्षाशी असहकाराचे धोरण अवलंबले आहे. शिवसेनेत आहोत मात्र शिंदेसोबत, असे म्हणत आमदार-खासदारांसोबत आता स्थानिक नेत्यांनीही सवता सुबा मांडला आहे. ठाणे, नवी मुंबईनंतर काल कल्याण-डोंबिवलीमध्येही नगरसेवकांनीही शिंदेच्या सोबत राहण्यास पसंती दिल्याने शिवसेनेची स्थिती बिकट होत आहे. त्यामुळे पक्षाकडूनही आता कडक निर्णय घेण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शिवसेना नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. विजय चौगुले, विजय नाहटा या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गुरुवारी या दोघा नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला होता. विजय चौगुले हे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. विजय नाहटा हे राज्य पर्यावरण समितीचे अध्यक्ष आहेत. या दोघांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षातून हकालपट्टी केल्याचे सामना वृत्तपत्रातून जाहीर केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. रात्री या दोघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. या बैठकीत कोणत्या पक्षाला कोणती आणि किती खाती मिळणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

Team Global News Marathi: