आघाडी सरकार मराठा समाजाला एप्रिल फुल करतेय! – अँड आशिष शेलार

 

 

महाविकास आघाडीमध्ये सगळं हास्यास्पद सुरु आहे. मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर महत्त्वाचे मुद्दे नीट मांडले नाहीत. आता कोणत्याही प्रकारची चर्चा, बैठक न घेता राज्यपालांना निवेदन दिले. ही मराठा समाजाची दिशाभूल आहे. मा. मुख्यमंत्री महोदय समाजाला एप्रिल फूल कऱण्याचा कार्यक्रम करु नका अशा शब्दात भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आघाडी सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला.

भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आरक्षणाचं नंतर मिळाले तरी चालेल, समाजाला सवलती द्या अशी भूमिका घेतली. आणि काल तेच मंत्री राज्यपालांची भेट घेऊन आरक्षण द्या अशी मागणी करतात. काँग्रेसच्या या अशा भूमिकांमुळे आता तुम्हाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. हे सरकार मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.महाविकास आघाडी सरकारमध्ये सुसूत्रता नाही. द्विधा मनस्थितीत काँग्रेस असून न्यायालयात हीच व्दिधा मनस्थिती घातक ठरली.

मागासवर्ग आयोगात मराठा समाजाची जी स्थिती अधोरेखित केली ती असाधारण स्थिती दमदारपणे मांडायची कि सर्वोच्च न्यायालयाच्या फुल बेंचने दिलेला इंद्रा सहानी हा निकाल कालबाह्य झाला हे मांडायचे? याबाबत राज्य सरकार व्दिधा मनस्थितीत राहिले त्यामुळे मराठा समाजाची बाजू खंबीर पणे मांडली गेली नाही, अशी टीका आमदार अँड आशिष शेलार यांनी यावेळी केली.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीची होती का प्रश्न पडतोय. तसेच योग्य नियोजन आणि अभ्यास न करता राज्यपालांना निवेदन दिले आहे. राज्यपालांना निवेदन देण्याआधी तज्ञांच्या समितीचे मत जाणून घेतले नाही. विरोधी पक्षाशी चर्चा केली नाही. विधानसभेत चर्चा झालेली नाही. मराठा समाजाच्या संघटनांशी चर्चा केली नाही. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची तयारी न करता राज्यपालांना निवेदन देऊन मराठा समाजाची फसवणूक राज्य सरकार करते आहे. मराठा समाजाला कृपया एप्रिल फुल्ल करु नका, असे ही आमदार अँड आशिष शेलार म्हणाले.

Team Global News Marathi: