शरद पवारांचे स्वीय सहाय्यक सतीश राऊत यांच्या नजरेतून ; भारत नाना भालके : तांबड्या मातीतला रूबाबदार नेता

शरद पवारांचे स्वीय सहाय्यक सतीश राऊत यांच्या नजरेतून ; भारत नाना भालके : तांबड्या मातीतला रूबाबदार नेता

पंढरपूर-मंगळवेढ्याची माती काळीभोर ! पाण्याचा थेंबन थेंब जखडून ठेवणारी,जवारीचं फक्कड मोती पिकवणारी. ह्याच काळ्या मातीत भारतनाना नावाचा तांबड्या मातीत रमणारा पैलवान गडी जन्माला आला.हा पैलवान लवकरच कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडून राजकारणाच्या आखाड्यात षड्डू ठोकून उभा राहिला. राजकारणाच्या आखाड्यातली माती तशी भुसभुशीत कमी आणि दलदलीची जास्त. तरीपण अंगाला कोणताही चिखल लागून न घेता ह्या पैलवानाने हे मैदान देखील गाजवले. तांबड्या मातीत लंगोट बांधून षड्डू ठोकणारा हा पैलवान राजकारणाच्या आखाड्यात मात्र अंगावर पांढरी शुभ्र खादी चढवून असे . पण त्या खादी पेहरावात देखील आपला पैलवान षड्डू ठोकून नेहमीच्या आक्रमक पवित्र्यात असे. हा पैलवान पुढारी मोठा रूबाबदार आणि भारदस्त दिसायचा. स्टार्च केलेली कडक खादी , डोक्यात धारदार गांधी टोपी मध्ये भारतनानाची लोकांवर छाप पडे ; त्यांचा आवाज समोरील माणसाच्या मनात नकळत जरब निर्माण करी.

मागील वर्षी विधानसभा निवडणूका पार पडल्यानंतर नवीन आघाडी जसजशी आकाराला येत गेली तसा माझा आणि भालकेनानांचा संवाद वाढू लागला. साहेबांच्या भेटी-गाठी घेण्यासाठी मी सर्वोतपरी सहाय्य करीत असे. ‘मतदारसंघात चांगले अधिकारी सुचवा’ असे मला आवर्जून म्हणाले होते. स्वत:चे जावई चांगल्या पदावर काम करत असल्याचा त्यांना अभिमान होता. पांडुरंगाच्या निस्सिम भक्ताकडे एकदा दिलेल्या शब्दाला किंमत होती. मी एकदा माझ्या मित्राची मंगळवेढा तहसीलदार पदासाठी शिफारस केली. त्यांनी माझ्या एका शब्दावर त्याची बदली केली. केवळ शब्दावर काम करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव घ्यावे लागेल.

कोरोनाच्या सावटाखाली जसा संचार थांबला तसा संवाद कमी झाला. पण विठ्ठल सहकारी साखर कारखाना अडचणींतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी फार काळ स्वस्थ न बसता , कोरोनाची फिकिर न करता मुंबई-पुण्याला जाणे-येणे चालू केले. नानांना किडणीचा त्रास होत होता हे मला त्यांच्याकडूनच समजले नाहीतर एवढ्या त्यांच्या मजबूत देहयष्टीकडे पाहता ते कुणालाही उमगले नसते. त्यांची रक्तातली साखर देखील सतत वाढलेली असायची. पण नाना त्याचा फार बाऊ करत नव्हते, लोकांमध्ये मिसळणे कमी करत नव्हते. कोरोनापासून त्यांनी सावध राहायला हवे होते.

मी साहेबांबरोबर बारामतीला असताना ऐन दिवाळीमध्ये लतिफ तांबोळी यांचा फोन आला. ‘पुण्याच्या रूबी हॉल हॉस्पीटलमध्ये नाना अडमिट आहेत आणि त्यांची तब्येत ठिक नसल्याचे’ त्यांनी सांगितले. रूबी हॉलचे प्रमुख डॉ. ग्रांट हे त्यावेळी परदेशात असल्याने त्यांचा साहेबांशी फोन जोडून देता आला नाही. परंतू त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना अधिक लक्ष देण्याविषयी सुचना देण्यात आल्या. मी थेट भारतनानांना फोन लावला. बऱ्याचदा कॉल करूनही प्रतिसाद आला नाही पण थोड्यावेळाने भारतनानांनी स्वत:हून फोन केला. नाना खोकत-खोकत बोलत होते. ‘मी बरा आहे पण दवाखान्याला वैतागलोय’ म्हणत होते. मी अधिक न बोलता ‘काळजी घ्या नाना !’ येवढे बोललो. नानांबरोबर झालेला माझा तो अखेरचा संवाद होता.
भारतनाना ग्रामीण महाराष्ट्राचा खरा प्रातिनिधिक चेहरा होते. कोणत्याही कलाकाराला कितीही मेकअप चढवून त्यांच्यासमोर उभे केले तरी भारतनानांच्या रूबाबाची सर त्याला येणार नाही.

नानांची तब्येत खालावली तशी साहेबांनी मुंबईच्या ब्रीच कॅंडी हॅास्पीटलमध्ये सेकंड ओपिनियन घेतले. रूबी हाॅलमध्ये गर्दीत जाऊन डाॅ. ग्रांट यांच्याकडे विचारपूस केली. पण चित्र फारसे आशादायक नव्हते. २८ नोव्हेंबरच्या रात्रीच नानांची प्राणज्योत मालवली. साहेबांनी नानांना शेवटचा निरोप राजकीय इतमामात द्यावा असे संबंधितांना सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वत: जातीने अंत्यविधीला उपस्थित राहिले.

साहेबांसारख्या वस्तादाला अशा पैलवान गड्याची कमी कायम जाणवत राहणार यात शंका नाही. अवघ्या चराचराचा देव ,पंढरीचा पांडुरंग त्यांच्या आत्म्याला चीरशांती देवो हीच प्रार्थना !

#भारतनाना #BharatBhalke #भारतभालके
@सतीश ज्ञानदेव राऊत

ग्लोबल न्युज नेटवर्क: