पाकिस्तानातून चीनला जाणारे रेडिओॲक्टिव्ह पदार्थ मुंद्रा पोर्टवर जप्त !

 

गुजरात | पाकिस्तानातून चीनला पाठविण्यात आलेले घातक किरणोत्सरी (रेडिओॲक्टिव्ह) पदार्थ गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर जप्त करण्यात आले आहेत. सदर पदार्थ असलेले कार्गाे कंटेनर्स मुंद्रा पोर्टवर येणे अपेक्षित नव्हते. अदानी पोर्ट्स आणि एसईझेडतर्फे ही माहिती देण्यात आली. काही दिवसांपूर्वी याच पोर्टवर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साथ सुद्धा सापडला होता.

यावर अडाणी समूहाने सांगितले की, आम्ही सीमाशुल्क विभाग आणि डीआरआयच्या या कारवाईत पूर्ण सहकार्य केले. तात्काळ कारवाई करण्यासाठी आणि समन्वयासाठी मदत केली. आम्ही त्यांच्या सतर्कतेला सलाम करतो. अदानी समूह राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याला गंभीरपणे घेतो. त्याच्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

कस्टम विभाग आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेले कार्गाे कंटेनर्स नॉन-हझार्डस म्हणजेच धोकादायक नसलेल्या श्रेणीत दाखविण्यात आले होते. मात्र, त्यात हझार्ड क्लास ७ या श्रेणीतील पदार्थ होते. ही श्रेणी रेडिओअ‍ॅक्टिव्ह पदार्थ सूचित करते. कंटेनर्समध्ये नेमके कोणते पदार्थ आहेत, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

हे कंटेनर्स कराची येथून चीनच्या शांघाय बंदराकडे नेण्यात येत होते. मुंद्रा पोर्ट किंवा भारतातील कुठल्याही पोर्टवर ते अपेक्षित नव्हते. त्यामुळे ते याठिकाणी कसे आले, याबाबत तपास करण्यात येत आहे. परदेशी मालवाहू नौकेतून अनेक कंटेनर्स जप्त करण्यात आले. माहिती न देता धोकादायक पदार्थांच्या वाहतुकीच्या संशयातून ते जप्त करण्यात आले होते. मुंद्रा पोर्टवर सर्व कंटेनर्स उतरविण्यात आले असून, त्यांचा तपास करण्यात येत आहे.

 

Team Global News Marathi: