शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला मनसेच्या एकमेव आमदाराचा पाठिंबा

 

कल्याण | कल्याणजवळ असलेल्या मोहने परिसरात मंदिराच्या बांधकामावर कारवाई केल्याच्या रागातून माजी नगरसेवकाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना शिवीगाळ करत मारहाण केल्यानंतर आता या प्रकरणात मनसेने उडी घेतली आहे. अश्चर्याची गोष्ट म्हणजे मनसेचे एकमेव आमदार असणाऱ्या राजू पाटील यांनी सहाय्यक आयुक्तांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची बाजू घेतली आहे.

 

कल्याणनजीक असलेल्या मोहने परिसरातील जुन्या गावदेवी मंदिर जीर्ण झाल्याने त्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी स्थानिकांनी मंदिराचे नव्याने बांधकाम सुरु केले. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी या बांधकामाला बेकायदेशीर ठरवीत कारवाई केली. या कारवाई विरेाधात स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले.

माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी प्रभाग कार्यालयात पा्ेहचून सहाय्यक आयुक्त सावंत यांच्या कानशीलात लगावली.या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मुकंद कोट यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर राजकारण तापले आहे. मनसे आमदार राजू पाटील हे घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी कारवाई करण्यात आलेल्या मंदिरात पोहचले. गावकऱ्यांशी त्यांनी या विषयावर चर्चा केली.

“हे अधिकारी आणि त्यांचे आका हे हिंदूत्व विसरले आहेत. हिंदू ह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित् गावातील मंदिरावर कारवाई झाली. सर्रासपणे अनधिकृत बांधकामे सुरु आहे. ते अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांना दिसत नाही. ज्या अधिकाऱ्याने ही कारवाई केली आहे. त्या अधिकाऱ्याने संपूर्ण गावाची आणि समाजाची माफी मागावी. नंतर आम्ही त्यांना कुठे बेकायदा बांधकाम सुरु आहे हे दाखवू,” असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: