माजी मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांना पुणे पोलिसांची क्लीन चिट

 

पुणे | टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचनी वाढल्या होत्या. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप आणि काही फोटोंमुळे विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. अखेर या प्रकरणामुळे राठोडांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी केला होता. त्यावर आता पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिल्याची माहिती समोर येत आहे.

पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पुण्यातील वानवडी पोलिसांना जबाब दिला. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही आणि आमचा कोणावरही आरोप नाही, असा जबाब पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पुणे पोलिसांना दिला आहे. त्यानंतरच संजय राठोड यांना क्लिन चिट देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या या जबाबानंतर या संदर्भातील एक अहवालही पुणे पोलिसांनी राज्य सरकारला सोपवला असल्याची माहिती समोर येत आहे.

राजीनाम्यानंतर काही काळ संजय राठोड राजकीय वर्तुळातून बाहेर होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा राठोड यांच्या मंत्री पदावरून सूचक विधान केले होते. त्यामुळे राठोड यांची पुन्हा मंत्री पदावर वर्णी लागणार की नाही अशा चर्चा आता राज्यभरात होऊ लागल्या आहे.

Team Global News Marathi: