मच्छिमार बोटीसह रत्नागिरी जिल्ह्यातील ६ खलाशी अद्याप बेपत्ता

 

रत्नागिरी | रत्नागिरीतील जयगड बंदरातून ७ खलाशांसह मासेमारीसाठी गेलेली बोट एक महिन्यापूर्वी अचानक गायब झाली होती. या घटनेला आज एक महिना उलटून गेल्यानंतर अद्याप ६ मच्छिमारांसह संबंधित बोट बेपत्ता आहे. मात्र त्या बोटीसोबत नेमकं काय झालं याचं कारणही अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांच्या जीवाला घोर लागला आहे. तर दुसरीकडे बेपत्ता असलेल्या खलाशांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या परतीची अपेक्षा सोडून देऊन त्यांचा अंत्यविधी देखील उरकला आहे. नावेद २ या मच्छिमार बोटीला जिंदाल कंपनीच्या मालवाहू जहाजाची धडक बसल्याचा संशय येथील मच्छिमारांसह स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला होता.

त्या अनुषंगाने याची चौकशी करावी अशी मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांकडे करण्यात आली होती. या घटनेला एक महिना उलटूनही बेपत्ता बोटीचा काहीच माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे तपास यंत्रणेविषयी अनेक संशय निर्माण होत आहेत. मच्छिमारांच्या म्हणण्याप्रमाणे बोटीला जर अपघात झाला असेल तर बोटीचे अवशेष तरी मिळणं अपेक्षित होतं. अगदीच काही नाही तर, बोटीवरचं काही सामान असं असतं जे पाण्यात बुडणारं नसतं. त्यामुळे ते तरी दिसायला हवं होतं. त्यामुळे हा घातपात तर नाही ना? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.

जर हा घातपात असेल तर केवळ मच्छिमारच नव्हे तर हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याचं स्थानिक मच्छिमारांनी म्हटलं आहे. याबाबत बोट मालक नासीर संसारे यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून या प्रकाराची चौकशी करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी जिंदाल मधून 26 ऑक्टोबरला गेलेल्या मालवाहू जहाजाच्या कॅप्टनची चौकशी केली आहे. घटनेच्या दिवशी आपल्याला बोट सदृश्य काहीतरी दिसलं असल्याची कबुली कार्गोच्या कॅप्टननं दिल्याचंही जयगड पोलिसांनी सांगितलं आहे.

Team Global News Marathi: